कलावंतांसाठी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा

शिवचरण वावळे
रविवार, 19 जानेवारी 2020

औरंगाबादनंतर नांदेड शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपासून या सांस्कृतिक शहराची नाळ खुंटली. शहरात पूर्वीप्रमाणे फारसे सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे शहराची ही सांस्कृतिक ओळख पुसली जाणार असे वाटत असतानाच शहरातील काही हौसी नाट्यकलावंत आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन शहराची सांस्कृतिक परंपरा जीवंत ठेवण्याच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे.

नांदेड : शहरातील नाट्य कलावंतांसाठी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेव्यतिरिक्त इतर स्पर्धांचे आयोजन होत नाही. म्हणून कलावंतांना आपले कला गुण दाखवण्यासाठी वर्षभर राज्य नाट्य स्पर्धेची वाट पहावी लागते, ही खंत लक्षात घेता स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, सिनेस्टार अभिनय अकादमीच्यावतीने रंगकर्मी दिनेश कवडे यांनी कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सन २०१८ मध्ये राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याच स्पर्धेत सातत्य ठेवत याही वर्षी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा, नांदेड-२०२० चे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ता.दोन फेब्रुवारी रोजी सिनेस्टार अभिनय अकादमीच्या मिनी थिएटर येथे होणार आहे. स्पर्धा खुल्या गटाकरिता असून यात वयाची कसलीही अट ठेवण्यात आलेली नाही. दहा वर्षाखालील बालकलावंतास विशेष पारितोषिक राखीव ठेवण्यात आले आहे. सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी चार मिनिटे आणि जास्तीत जास्त सात मिनिट ठेवण्यात आले असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय यासह पुरुष उत्तेजनार्थ व स्त्री उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हेही वाचा - बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा

भाग घेण्यासाठी २८ जानेवारीपूर्वी प्रवेश अर्ज भरावे
सर्व सहभागी कलावंतांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ता.२८ जानेवारीपूर्वी प्रवेश अर्ज भरून सिनेस्टार अभिनय अकादमी, बाबानगर, जवाहरनगर नांदेड येथे पाठवावे किंवा प्रत्यक्ष आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शहरातील कलावंत आपला सहभाग नोंदवत असून शहरातील जास्तीत जास्त कलावंतांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक, रंगकर्मी दिनेश कवडे यांनी केले आहे.

हेही वाचलेच पाहिजे - बाळाला जन्मतःच ‘का’ करावे लसीकरण : ते वाचलेच पाहिजे

राज्य नाट्य आणि राज्य बाल नाट्य स्पर्धेतून नव कलावंतांची जडणघडण होत असून, याचा नाटकातून दिग्दर्शक विनोद लव्हेकर, सिनेदिग्दर्शक तथा लेखक राज दुर्गे, अभिनेता कपिल कांबळे, सहाय्यक दिग्दर्शक कुणाल गभारे, अभिनेत्री नुपूर चितळे, श्याम डुकरे, प्रदीप शिंदे, गोविंद मरसिवणीकर, संगीतकार ए. व्ही. प्रफुलचंद्र, राम चव्हाण, रवी जाधव, बालकलाकार संस्कृती पाटील, विवंश पांडे. वेदांत स्वामी, किरण टाकळे, माधुरी लोकरे ही कलावंत नाट्य संकृतीची देणे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State-level singular acting competition for artists