लातूरच्या दोन शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

विकास गाढवे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जीवाचे रान करणाऱ्या गंगापूर (ता. लातूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शिक्षिका संगीता पवार आणि विज्ञानाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर नेणाऱ्या भादा (ता. औसा) येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे शिवलिंग नागापूरे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने ज्ञानरचनावाद आणि विज्ञानातील प्रयोगशीलतेचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.
 

लातूर : ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जीवाचे रान करणाऱ्या गंगापूर (ता. लातूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शिक्षिका संगीता पवार आणि विज्ञानाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर नेणाऱ्या भादा (ता. औसा) येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे शिवलिंग नागापूरे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने ज्ञानरचनावाद आणि विज्ञानातील प्रयोगशीलतेचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.

यातील श्रीमती पवार या प्राथमिक तर श्री. नागापूरे हे माध्यमिक शिक्षक आहेत. दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेचे असल्याने पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्ता ठळकपणे पुढे आली आहे. श्रीमती पवार यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. शिक्षणातील अभिनव कल्पना असलेल्या ज्ञानरचनावादाची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी मागील तीन वर्ष आपला वर्ग शंभर टक्के प्रगत ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यांनी लिहिलेले छोटे दोस्त हे पुस्तक खूप गाजले. शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकात या पुस्तकाचा विशेष उल्लेख केला असून प्रधान सचिव नंदकुमार यांच्या पुढाकाराने हे पुस्तक राज्यभरातील सर्व शाळांत पोहच झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड केली आहे.

नागापूरे हे विज्ञानाचे शिक्षक असून विज्ञानातील प्रयोगाचा त्यांचा हातखंडा आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग गाजले. या प्रयोगांना पुरस्कारही मिळाले आहेत. अखिल भारतीय राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात सलग तीन वर्ष त्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. राज्य सरकारने ई - कंटेटसाठी तयार केलेल्या दिक्षा अॅपच्या निर्मितीही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित असून अनेक विषयावर त्यांनी व्याख्यानही दिले आहे. यामुळे त्यांची यंदाच्या राज्य शिक्षक पुरस्काराठी निवड झाली आहे. राज्य पुरस्काराच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव झाला आहे.

Web Title: State teacher award for two teachers declared in latur district