esakal | अनलॉकनंतर लाल परी जोरात; अवघ्या आठ दिवसांत लाखोंचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

bus

अनलॉकनंतर लाल परी जोरात; अवघ्या आठ दिवसांत लाखोंचे उत्पन्न

sakal_logo
By
कमलेश जाब्रास

माजलगाव (बीड): रूग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने अनलॉक सुरू केले आहे. तिसऱ्या टप्प्यात असलेल्या बीड जिल्ह्यातही टाळेबंदी शिथिल करण्यात आली असून, ७ जूनपासून बससेवा सुरू झाली आहे. आता बससेवा पूर्वपदावर येत आहे. अवघ्या आठ दिवसांत येथील आगारास जवळपास १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

माजलगाव आगारात एकूण ५८ बसेस आहेत. टाळेबंदीमुळे मागील दोन महिन्यांपासून बससेवा बंद होती. यात आगाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. १६ मार्च ते ६ जूनपर्यंत बस बंद होत्या. परंतु, ७ जूनला बससेसवा सुरू झाली. अन् पहिल्याच दिवशी जवळपास ५५ हजार रुपये आगारास मिळाले. ८ जून पासून या उत्पन्नात वाढत होत गेली. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आगारातील ५८ पैकी ३५ बस सध्या प्रवाशांसाठी सेवा देत आहेत. लांब पल्याच्या बसेसला पाहिजे तसा प्रतिसाद प्रवासी देत नसल्याने उर्वरित बस बंद आहेत. या बस देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. सध्या वाहक, चालक, मेकॅनिक यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. मे महिन्याचे वेतन देखील लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख डी. बी. काळम पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना! कर्ज वाटपाचा टक्का केवळ ९.८५

ग्रामीण भागाची बससेवा बंद
माजलगाव आगारास तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायती जोडलेल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात आगाराची बस जाते. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्तच आहे. प्रवाशांची काळजी म्हणून ग्रामीण भागात बससेवा बंद आहे.

या बसफेऱ्या सुरू
आगारातून लातूर, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या मोठ्या शहराच्या बससेवा सध्या सुरू आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! लातुरात मतिमंद महिलेचे बाळ दुसऱ्याच्या नावावर

अनलॉक झाल्यापासून आठ दिवसांत आगारास चांगले उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ५८ पैकी फक्त ३५ बसेस सुरू आहेत. प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करून बस पाठविली जात आहे. प्रवाशांनी बिनधास्त बसने प्रवास करावा. परंतु, कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. जेणेकरून संभाव्य धोका टाळण्यासाठी मदत होईल.
डी. बी. काळम पाटील, आगार व्यवस्थापक.

loading image