किराणा दुकान फोडून पावणे दोन लाखांचा माल चोरला; काजू, बदाम, गोडतेलही पळवले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

मांजरसुंबा रोडवर असलेल्या अझर ट्रेडिंग कंपनी हे किराणा दुकान गुरुवारी (ता.१७) पहाटे चोरट्यांनी फोडून जवळपास पावणे दोन लाखाचा लाखाचा माल लंपास केला.

नेकनुर (जि.बीड) : मांजरसुंबा रोडवर असलेल्या अझर ट्रेडिंग कंपनी हे किराणा दुकान गुरुवारी (ता.१७) पहाटे चोरट्यांनी फोडून जवळपास पावणे दोन लाखाचा लाखाचा माल लंपास केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नेकनूर येथील मांजरसुंबा रोडवर शेख अझर शेख खाजामिया यांचे अझर ट्रेडिंग कंपनी या नावाने किराणा मालाचे होलसेल व किरकोळ दुकान आहे. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी चॅनल गेटच्या कुलूपा जवळच्या पट्ट्या तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील जवळपास ६० गोड तेलाचे डबे, काजू-बदाम, व्हील पावडर यासारख्या किमती वस्तू पळवल्या.

 

 

चोरट्यांनी पळवलेल्या या वस्तूची किंमत जवळपास पावणेदोन लाखाच्या आसपास आहे. चोरट्यांनी सुरवातीला दुकानाच्या समोर आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, त्यानंतर शटर उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातीलही सी. सी. टी. व्ही कॅमेरे वाकवले तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डाटा रेकॉर्ड समजून टी.व्ही.चा सेट अप बॉक्स पळवला. चोरट्यांना डाटा रेकॉर्डर चोरून नेण्यात चोरटे अपयशी ठरले. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरात जवळपास तीन चोरटे कैद झाले आहेत.

 

 

नेकनुरमध्ये यापूर्वी घडलेल्या चोऱ्या व व काल झालेली चोरी यामध्ये बरेच साम्य असून चोरीची घटना प्रत्यक्ष अमलात आणण्यापूर्वी चोरटे रेकी करत असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक श्री. काळे हे करत आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stealing From Daily Needs Shop Neknoor Beed News