esakal | लातूरला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Deshmukh

महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशात शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेल्या लातूर येथे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला घेतला आहे.

लातूरला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशात शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेल्या लातूर येथे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पाठपुराव्यातून हे विभागीय केंद्र मंजूर झाल्याने लातूरच्या वैभवात भर पडणार आहे. जे-जे नवं ते-ते लातूरला हवं असा ध्यास असलेल्या लातूकरांमुळे या शहराचा आणि जिल्ह्याचा विकास झाला आहे. विकासाची ही प्रक्रिया कायम सुरू आहे.

मागच्या काळात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरचे लोकप्रतिनिधी या नात्याने या शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी कोणत्याही मागणीची वाट न पाहता अनेक योजना राबवल्या यातून येथील विकास प्रक्रियेने मोठी गती घेतली.लातूर येथील पालक, शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थी यांची जिद्द आणि त्यातून निर्माण झालेले शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन येथे असंख्य शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. लातूर शिक्षण क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण होऊन लातूरचा आदर्शवत शैक्षणिक पॅटर्न निर्माण झाला.

सातत्यपूर्ण शैक्षणिक यशामुळे लातूर एक शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. हे शैक्षणिककेंद्र प्रस्थापित होण्यासाठी शाळा महाविद्यालया बरोबरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ विभागीय कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथे सुरू करण्यात आले. त्या काळात फक्त शैक्षणिक सुविधांची विभागीय कार्यालय लातूरला आली असे नव्हे तर कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, परिवहन, सहकार, धर्मादाय, जलसंपदा यासह २५ ते ३० खात्याची विभागीय कार्यालय लातूरला येऊन लातूरची सर्वांगीण प्रगती होत राहिली आहे.


विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्यापूर्वी ज्या ज्या खात्याचे मंत्री राहिले त्या प्रत्येक खात्याच्या योजना लातूरल्या आणल्या. शिवाय या प्रत्येक खात्याचे विभागीय कार्यालय लातूरला सूरू झाले. तोच पायंडा श्री. अमित देशमुख पुढे चालवत आहेत. श्री. देशमुख यांनी कॅबिनेटमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर त्यांनीही महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर केले आहे. नाशिक येथे सदरील विद्यापीठ सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर या ५ ठिकाणी विभागीय केंद्र स्थापन करण्यात आली होती. यातील औरंगाबाद विभागीय केंद्राचे विभाजन करून आता ते कार्यालय लातूर येथे विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या विभागीय केंद्रामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार असून लातूरच्या शैक्षणिक विकासासाठी आणखीन गती मिळणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image