'आशा' झाडाची फळे खाल्ल्यास मूल होते; मौलानाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

"दर्ग्याचा सहभाग नाही' 
यासंदर्भात दर्ग्याचे अध्यक्ष नवाब कमरोद्दीन तमीजोद्दीन यांनी सांगितले, ""श्रद्धेमुळे असे प्रकार होतात. त्यात दर्ग्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभाग नाही.'' दर्ग्याचे सचिव शफियोद्दीन फसियोद्दीन यांनीही श्रद्धेपोटी भाविक येत असल्याचे सांगितले. मौलाना समीर यांनीही "अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांसमोर भाविकांच्या श्रद्धेबद्दलच सांगितले. दरम्यान, या दाव्यांबाबत कुणाचीही लेखी तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद  - खुलताबाद तालुक्‍यातील एका दर्ग्याच्या परिसरातील "आशा' नामक झाडावरची फळे खाल्ल्यास मूल होते, असा दावा करणाऱ्या व तसा व्हिडिओ यू-ट्यूबवर टाकून चर्चेत आलेल्या मौलानाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्टिंग ऑपरेशन करीत भांडाफोड केला आहे. पोलिसांच्या मदतीने समितीने केलेल्या या स्टिंग ऑपरेशननंतर संबंधितावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. 

सूलिभंजन (ता. खुलताबाद) परिसरातील हजरत शेख शहा जलालउद्दीन गंजेरावा सोहोरवर्दी दर्गा आहे. श्रद्धेपोटी अनेक भाविक येथे भेट देतात. नवस म्हणून तेथील "आशा' नामक झाडांना दोरा, कापड बांधतात. काही जण खिळेही ठोकतात. "आशा' झाडाची फळे खाल्ल्यास मूल होत असल्याचा दावा दर्ग्याचे मुजावर मौलाना मोहम्मद समीर यांनी यू-ट्यूबवर व्हिडिओद्वारे केला. विशेष म्हणजे, अशा प्रकाराने तृतीयपंथीयांनाही मुलगा झाल्याचे नमूद करून संबंधित तृतीयपंथीयाची कबर दर्गा परिसरात असल्याचे सांगितले होते. 

मुजावर मौलाना मोहम्मद समीर यांच्या या व्हिडिओची दखल "अंनिस'च्या औरंगाबाद शाखेने घेतली. "अंनिस'चे प्रदेश सरचिटणीस शहाजी भोसले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंह यांची भेट घेतली. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या या दाव्याची दखल घेऊन संबंधितावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर "अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांनी खुलताबादच्या पोलिस निरीक्षकांना स्टिंग ऑपरेशन करणार असल्याची कल्पना दिली. सहायक पोलिस निरीक्षक शेख शफिक व पथकाने "अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांसोबत मौलाना समीर यांची भेट घेऊन दर्गा परिसरातील दोन "आशा' झाडांची पाहणी व चौकशी केली. 

""दर्ग्यासमोरच्या झाडाचे फळ खाल्ल्यास मुलगी, तर मागच्या बाजूला असलेल्या झाडाचे फळ खाल्ल्यास मुलगा होतो. याशिवाय याच परिसरात "परियों का तालाब' असून, त्यात महिलांनी सात गुरुवारी, रात्री विवस्त्रावस्थेत स्नान केल्यास त्यांना भूतबाधा, पिशाच्च बाधा यापासून मुक्ती मिळते. या तलावात स्नान केल्यास दुर्धर रोगही बरे होतात,'' असा दावाही मौलानाने केल्याचे भोसले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

"दर्ग्याचा सहभाग नाही' 
यासंदर्भात दर्ग्याचे अध्यक्ष नवाब कमरोद्दीन तमीजोद्दीन यांनी सांगितले, ""श्रद्धेमुळे असे प्रकार होतात. त्यात दर्ग्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभाग नाही.'' दर्ग्याचे सचिव शफियोद्दीन फसियोद्दीन यांनीही श्रद्धेपोटी भाविक येत असल्याचे सांगितले. मौलाना समीर यांनीही "अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांसमोर भाविकांच्या श्रद्धेबद्दलच सांगितले. दरम्यान, या दाव्यांबाबत कुणाचीही लेखी तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

चमत्काराने मूल होत नाही. जादूटोणा कायदा-2013 अंतर्गत हा गुन्हा आहे. या दाव्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. 
- शहाजी भोसले, प्रदेश सरचिटणीस, "अंनिस' 

Web Title: Sting operation by the Superstition Nirmulan Samiti