अरे देवा! सापांचे तोंड शिवून भोंदुबाबाचा खेळ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

एक भोंदुबाबा दोन सापाचे तोंड चक्क दोऱ्याने शिवून अनोखे खेळ करीत होता. हा सर्व प्रकार लातूर येथील सर्पमित्रांच्या निदर्शनास आल्याने सापाला जीवदान मिळाले आहे.

लातूर : काळ बदलला असला तरीही आज वन्यप्राण्यांच्या जीवाचा खेळ करून पोटाची खळगी भरणारी मंडळी आपणास पहावयास मिळते. असाच प्रकार बिदर जिल्ह्यातील मैल्लापूर येथील खंडोबा यात्रेच्या प्रसंगी घडला. एक भोंदुबाबा दोन सापाचे तोंड चक्क दोऱ्याने शिवून अनोखे खेळ करीत होता. हा सर्व प्रकार लातूर येथील सर्पमित्रांच्या निदर्शनास आल्याने सापाला जीवदान मिळाले आहे.

मैल्लापूरमध्ये दरवर्षी खंडोबा यात्रा भरते. या यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. यात्रेकरुंची करमणूक करण्याच्या उद्देशाने सापाच्या जीवाशी खेळण्यात आले. याठिकाणी सापाचे तोंड दोन्ही बाजूने दोरीने टाके घेऊन बंद करण्यात आले होते. यात्रेकरुंची गर्दी पाहून लातूरहून गेलेले सर्पमित्र ज्योतिराम कोकणे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ह्या विचित्र खेळ थांबविण्यास सांगितले, असता त्यांनाही या भोंदुबाबाने विरोध केला होता. मात्र, सर्पमित्राचे ओळखपत्र दाखवून हा जीवघेणा खेळ थांबिवला आणि सापाला घेऊन त्यांनी रेणापूर येथील रुग्णालय गाठले. मात्र, या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमी सापाला घेऊन ते डॉ. शिंगटे यांच्या पेट डॉग क्लिनिकमध्ये गेले आणि त्यावर उपचार करण्यात आले. 

याकरिता सर्पमित्र भिमाशंकर गाढवे यांनी कोकणे यांना मदत केली. सध्या दोन्ही सापावर योग्य उपचार झाले असून ते सुस्थितीमध्ये आहेत. योग्य ते उपचार करून या दोन्ही सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे

Web Title: stitched a mouth of snake and play with them at Latur