बीडची सुन्न करणारी घटना - जीवघेण्या प्रसंगातही गर्भवतीबाबत अनास्था 

अनिरुद्ध धर्माधिकारी
Wednesday, 22 April 2020

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वेळेवर रुग्णवाहिका मिळू न शकल्याने मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या रुग्ण महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिका पेटवून दिली; तसेच दगडफेक करून रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. 

आष्टी (जि. बीड) - तालुक्यातील खरडगव्हाण येथून उपचारासाठी आलेल्या व प्रकृती नाजूक बनलेल्या गर्भवती महिलेला येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर डॉक्टर व त्यामुळे रुग्णवाहिका मिळू न शकल्याने कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तोळामासा अवस्थेत अखेर या महिलेला नातेवाइकांनी खासगी वाहनातून कसेबसे मिळवून बीडच्या जिल्हा रुग्णालयात रवाना केले. 

तालुक्यातील खरडगव्हाण येथील सव्वीसवर्षीय महिलेला वेदना होत असल्याने अत्यवस्थ अवस्थेत नातेवाइकांनी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले होते. तपासणीनंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्रकृती नाजूक असल्याने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणून तपासणी केल्यानंतर उपचार करूनही महिलेचा त्रास कमी होत नसल्याने सोनोग्राफी करण्यात आली. यामध्ये या महिलेच्या गर्भपिशवीमध्ये गर्भ वाढण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये गर्भाची वाढ झाल्याचे आढळून आले.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून या महिलेस बीड येथे पाठविण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका बीड येथे औषध आणण्यासाठी गेल्याने उपलब्ध होऊ शकली नाही. लॉकडाउनमुळे खासगी पर्यायी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हती. याच वेळी रुग्ण महिलेसोबत आलेल्या नातेवाइकांना ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीशेजारी १०८ रुग्णवाहिका दिसून आली. तिच्या चालकाला नातेवाइकांनी डॉक्टरांनी रुग्णाला बीड येथे घेऊन जायला सांगितले आहे, असे सांगून लवकर निघण्याची विनंती केली.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

मात्र, चालकाने रुग्णाची प्रकृती नाजूक असल्याने मला रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याशिवाय निघता येणार नसल्याचे सांगितले; तसेच १०८ क्रमांकाला फोन लावा, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले; परंतु १०८ हा क्रमांक डायल करूनही लागला नाही. त्यामुळे नातेवाईक पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आले व त्यांनी तेथे तुम्ही तुमचा एखादा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमच्याबरोबर पाठविण्याची विनंती केली. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ साठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी असतो, आम्हाला पाठविता येणार नसल्याचे सांगितले. नाजूक प्रकृतीच्या या महिलेला शेवटी नातेवाइकांनी महत्प्रयासाने खासगी वाहन उपलब्ध केले व तोळामासा अवस्थेत बीडकडे रवाना झाले. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

रुग्णवाहिका पेटविण्याचा प्रयत्न 
रुग्णाची प्रकृती नाजूक असतानाही रुग्णवाहिका उपलब्ध न होता डॉक्टर व रुग्णवाहिकाचालकाने अनास्था दाखवून टोलवाटोलवी केल्याने आधीच चिंताग्रस्त असलेल्या नातेवाइकांचा संताप अनावर झाला. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेवर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला; तसेच दगडफेक करून काचाही फोडल्या. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने झाडांच्या फांद्यांच्या साह्याने रुग्णवाहिकेला लागलेली आग आटोक्यात आणली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

रुग्ण महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने दुपारी अडीचच्या सुमारास बीड येथे जाण्यास सांगण्यात आले होते. येथील रुग्णवाहिका औषधे आणण्यासाठी बीड येथे गेल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिका नेण्याचे ठरविले; मात्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होऊ न शकल्याने पुढील प्रकार घडला. 
- प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, आष्टी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stone throwing on ambulance in Beed district