शेतकरी त्रस्त: पीक कर्जाला फेरफार नक्‍कलचा अडथळा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

बँक प्रशासनाकडून पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या जुन्या खातेदाराला फेरफारची नक्कल मागणी करू नये, नवीन कर्जदार शेतकरी असल्यास व त्यास फेरफार नक्कलची आवश्यकता असल्यास तसे लेखी पत्र संबंधिताच्या नावे देण्यात यावे, अशा सूचना तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी बॅंकांना दिल्या आहेत. 

कळमनुरी(जि. हिंगोली) : बँकांकडून शेतकऱ्यांकडे फेरफार नक्कलची मागणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात फेरफार नक्कल मागणीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेरफार मागणे बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी बँकांना पाठविलेल्या पत्रात दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात विनाकारण कुठल्याही कारणास्तव गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. काही दिवसांत पीककर्ज नुतनीकरण करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही बँकांकडून फेरफार नक्कल मागितली जात जात आहे. 

हेही वाचाहिंगोलीत भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक 

बँकांना पत्र पाठवून दिल्या सूचना

त्यामुळे फेरफार नक्कल काढण्यासाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी बँकांना पत्र पाठवून या संदर्भात सूचना दिल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पीककर्ज नुतनीकरण करण्यासंदर्भात हालचाली चालविल्या आहेत. यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला फेरफार नक्कलची मागणी केल्या जाते. 

बँकेकडे सर्व दस्तऐवज उपलब्ध

त्यामुळे नक्कल काढण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात येत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे बँक प्रशासनाने येणाऱ्या खातेदार व ग्राहक जुने असल्यामुळे बँकेकडे त्यांच्या नावाचे सर्व दस्तऐवज उपलब्ध आहेत. खातेदाराचे नाव बदलाण्याबाबत महाभूमी या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

फेरफार नक्कल अनेक वर्षे जुनीच

 शिवाय सातबारावरील बदलाच्या नोंदीसंदर्भात अद्यावत असे ॲप आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यावरून आपण खात्री करून घ्यावी. फेरफार नक्कल अनेक वर्षे जुनीच असल्याने त्यामुळे मागील वर्षी कर्जदाराने दाखल केलेल्या फेरफार कोणताही बदल होत नाही, असे सुचविण्यात आले आहे.

फेरफारची आवश्यकता असल्यासच लेखी पत्र द्या

त्यामुळे बँक प्रशासनाकडून पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या जुन्या खातेदाराला फेरफारची नक्कल मागणी करू नये, असे सुचविले आहे. यामध्ये नवीन कर्जदार शेतकरी असल्यास व त्यास फेरफार नक्कलची आवश्यकता असल्यास तसे लेखी पत्र संबंधिताच्या नावे देण्यात यावे. त्यास नक्कल देता येईल. तसेच तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची होणारी अनावश्यक गर्दी कमी करता येईल, असे बँकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फेरफार पुराव्यासाठी अडवणूक करू नये

हिंगोली : पीककर्ज मागणीसाठी बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून फेरफार नक्कलची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न करता पीककर्ज तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांची जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत नऊ हजार मजुरांच्या हाताला काम

तहसील कार्यालयात गर्दी

जिल्हाभरात शेतकऱ्यांकडून पीककर्जाची मागणी होत आहे. मात्र, बँकांकडून शेतकऱ्यांची फेरफार आणि इतर कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात आहे. परिणामी फेरफारची नक्कल काढण्यासाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. यातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रसार नाकारता येत नाही. बँकेत येणारा खातेदार ग्राहक जुनाच असेल तर त्यांचे सर्व कागदपत्र, दस्तावेज बॅंक शाखेमध्ये उपल्बध आहेत.

खासदार हेमंत पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 त्यांच्या अद्यायावत नावाबाबत खातर जमा करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळांचा उपयोग करण्यात यावा. बँकेत येणाऱ्या कोणत्याही जुन्या खातेदाराकडून फेरफार नक्कलची मागणी करण्यात येऊ नये व शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, तशा सूचना राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा अग्रणी बँक व मध्यवर्ती बँकेला द्यावेत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop Asking For Duplicate Modification Hingoli News