
महापालिकेच्या जुना मोंढा भागात असलेल्या सेंट्रल नाक्यावर करवसुलीत मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ होत असल्याचे समोर येत असून या प्रकरणी पालिका प्रशासनाने चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
परभणी : महापालिकेच्या जुना मोंढा भागात असलेल्या सेंट्रल नाक्यावर करवसुलीत मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ होत असल्याचे समोर येत असून या प्रकरणी पालिका प्रशासनाने चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. गत महिन्यात जवळपास ८० ते ९० पावत्या या ठिकाणी वाहने उभी केलयानंतर फाडलेल्या असून त्याचा भरणा मात्र केलेला नाही. मग लॉकडाउनच्या काळात कुठलीच वाहने आली नाहीत का ? हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेच्या एका सभापतीने केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेचा जुना मोंढा भागात हा सेंट्रल नाका असून तेथे वाहने पार्किंग करण्यासाठी मोठी जागा आहे. हा भाग व्यापारीपेठेत येत असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची रेलचेल असते. ती वाहने माफक दरात लावण्यासाठी महापालिकेने सेंट्रल नाका येथे जागा उपलब्ध करून दिली आहे.
कर वसुलीची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर
याठिकाणी लावण्यात येणाऱ्या वाहनांकडून कर वसूल करण्याची जबाबदारी मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आहे. वास्तविक पाहता ही जागा कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी अनेक वेळा निविदा काढण्यात येतात. परंतू, त्या निविदांना कधीच प्रतिसाद मिळत नाही. यामागे देखील वेगळेच गुपित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पालिका प्रशासन नाइलाजाने येथील कर वसुलीचे काम आपल्याच कर्मचाऱ्यांवर सोपवते. तेथे किती वाहने दररोज लागतात किती वाहनांकडून वसुली होते हे मात्र उघड गुपित आहे.
सभापतींच्या तपासणीत माहिती उघड
महापालिकेचे एक विद्यमान सभापती सेंट्रल नाका परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील एका कर्मचाऱ्यास वसुली विषयी चौकशी केली असता ही बाब समोर आली. सदरील कर्मचाऱ्याने पावती बुक दाखवले परंतु त्या कराचा भरणा महापालिकेच्या रोखपालाकडे न करता अन्य कर्मचाऱ्यांकडे केल्याचे बाब उघड झाली. त्या सभापतींनी या प्रकरणाचा पंचनामा केला त्याला साक्षीदार घेतले आणि ही बाब पालिका प्रशासनाने कानावर घातल्याचे बोलले जात आहे. लॉक डाउनच्या काळात काही महिने मालवाहतूकीला परवानगी होती. परंतु या काळात सेंट्रल नाक्यावर कुठल्याच प्रकारची वसुली झाली नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर गत महिन्यात जवळपास ८० ते ९० पावत्या फाडलेल्या असून त्याचा भरणा मात्र केलेला नाही. मग लॉकडाउनच्या काळात कुठलीच वाहने आली नाहीत का ? हा मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा - बाप रे बाप ! कोविड सेंटरमध्ये घुसला साप- डॉक्टर, कर्मचाऱ्यासह रुग्णांचीही तारांबळ
सखोल चौकशी सुरू आहे
या प्रकरणाची माहिती घेतली जात असून सखोल चौकशी सुरू केली आहे. यामध्ये दोषी आढळून आल्यास सदरील कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल. - प्रदीप जगताप, उपायुक्त, महापालिका, परभणी.
संपादन ः राजन मंगरुळकर