दोन गटांतील वादामुळे पालम शहरात तणाव; दगडफेक-जाळपोळीच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

रात्री शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दंगोखोरांना अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू केली होती. 

पालम : पालम शहरात बुधवारी (ता. 17) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनादेखील घडल्या. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. 

पालम शहरात सायंकाळी साडेसात वाजता अचानक दोन गटांत जुन्या भांडणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी लागलीच आपापली प्रतिष्ठाणे बंद केली. या वेळी शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दगडफेक होत असल्याने शहरातून जाणारा लोहा-गंगाखेड राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी रस्त्याने होती.

दोन्ही गटांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आले. संतप्त जमावाने वाहनांचीही तोडफोड केली. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण होऊन सर्वत्र भीतीचे वातावरण दिसत होते. या वेळी तत्काळ पोलिस प्रशासनाने शहरातील घटनेचा ताबा घेत परिस्थिती नियंत्रनात आणण्याच प्रयत्न सुरू केला. रात्री राज्य राखीव दलाची तुकडीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर शहरातील परिस्थिती आटोक्यात आली.

दरम्यान, रात्री शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दंगोखोरांना अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू केली होती. 

पालम शहरातील परिस्थिती ती आटोक्यात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात तणाव निर्माण करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागेल. 
- व्ही. एम. श्रीमनवार, पोलीस निरीक्षक पालम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stress in Palam city due to dispute in two groups