esakal | Video - परभणी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जात आहे. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी शहरात कर्तव्यावर हजर आहेत.

Video - परभणी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात गुरुवारी (ता. दोन) पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जात आहे. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी शहरात कर्तव्यावर हजर आहेत.

परभणी शहरात गुरुवारी (ता.दोन) कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आले आहेत. या आधी सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यातील ९४ जण दुरुस्त होवून आपआपल्या घरी परतले आहेत. परंतू अचानक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा अठरावा बळी -

परभणी शहरात पहाटेपासूनच पोलिसांची गस्त सुरु झाली आहे. शहरातील वसमत रस्ता, जितूंर रस्ता, गंगाखेड रस्ता यासह शहरातील सर्व प्रमुख चौक व इतर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परभणी शहराचे सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सकाळी जिंतूर रस्त्यावरील वाहनांची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे उपस्थित होते.

हे देखील वाचाच - हिंगोलीत उभारली जाणार सुंदर शिल्पे -

शहरात सुट देण्यात आलेल्या लोकांनाच संचारबंदी दरम्यान घराबाहेर पडू दिले जात आहे. परंतू इतर नागरीकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सलग तीन दिवस शहरातील सर्व बाजारपेठ बंद राहणार असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

शहराच्या बाहेर जाणाऱ्यांची तपासणी

इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात परभणी शहरातून जाणाऱ्या सर्व वाहनांची कडकपणे तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान गाड्याचे प्रवाशी पास देखील तपासले जात आहेत. गाडीत बसलेल्या सर्व प्रवाशांनी मास्क लावले आहेत का याची देखील तपासणी केली जात आहे.

येथे क्लिक कराच - मांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार

कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचार बंदी लागू केली आहे. या संचारबंदीचे शहरातील सर्व नागरीकांनी पालन करावे. कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा पोलिस कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधिक्षक, परभणी