जयहिंद पब्लिक महाविद्यालयात 12 विद्यार्थ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

औरंगाबाद  - लाडसावंगी येथील सामुदायिक कॉप्यांच्या प्रकरणानंतर बोर्डाचे अपयश झाकण्यासाठी अधिकारी सतर्कता बाळगत असून, बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरला तब्बल 12 विद्यार्थ्यांवर बुधवारी (ता.8) कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप यांच्या पथकाने जयहिंद पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय सुंदरवाडी केंद्र येथे ही कारवाई केली.

औरंगाबाद  - लाडसावंगी येथील सामुदायिक कॉप्यांच्या प्रकरणानंतर बोर्डाचे अपयश झाकण्यासाठी अधिकारी सतर्कता बाळगत असून, बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरला तब्बल 12 विद्यार्थ्यांवर बुधवारी (ता.8) कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप यांच्या पथकाने जयहिंद पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय सुंदरवाडी केंद्र येथे ही कारवाई केली.

बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्याच पेपरला वरुडकाझी येथे दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. मात्र लाडसावंगीच्या कॉपी प्रकरणानंतर पथकांच्या केंद्र भेटी वाढल्या आणि बुधवारी एकाच केंद्रावर पथकाला 12 "मुन्नाभाई' आढळले. कारवाई झालेले हे परीक्षा केंद्र शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या नातेवाइकाचे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कॉपीप्रकरणी बीड जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

पर्यवेक्षकांकडे आढळला मोबाईल
परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक आणि कस्टोडियनशिवाय पर्यवेक्षकांना मोबाईल वापराची बोर्डातर्फे बंदी घातली आहे. तशा आशयाचे पत्रही बोर्डातर्फे संबंधितांना दोन दिवसांपूर्वीच दिले. मात्र काल दहावीच्या परीक्षेस अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर मोबाईलचा सर्रास वापर करण्यात आला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 8) बोर्डाचे आदेश मिलिंद विज्ञान महाविद्यालयात पायदळी तुडविण्यात आले. या ठिकाणी दोन पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळून आल्यानंतर विभागीय अध्यक्षांनी कारवाईचा पवित्रा घेतला. त्यांनी संबंधितांना फोनवरून पोलिसांत तक्रार देण्याची तंबी दिली. या महाविद्यालयातील बैठे पथकातील अधिकारी ओळखपत्र नसल्याने त्यांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले.

बैठे पथकांची करणार चौकशी
बैठे पथकांतील सर्व अधिकारी महसूल विभागाचे आहेत. दररोज काही केंद्रांवरील बैठे पथकातील अधिकारी गायब असल्याची बाब बोर्डाच्या सचिव वंदना वाहूळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठे पथकातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार असून, याविषयी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: student crime in jaihind public college