वाळूज : पाझर तलावात आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

आर. के. भराड
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह शेरोडी येथील एका पाझर तलावात शनिवारी (ता. सात) दुपारी आढळला.

वाळूज (जि. औरंगाबाद) - अंबेलोहळ येथून शुक्रवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह शेरोडी येथील एका पाझर तलावात शनिवारी (ता. सात) दुपारी आढळला. त्याचे कपडे तलावाच्या काठावर असल्याने तो पोहण्यास गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आसेफ रशीद शेख असे मृताचे नाव आहे. 

आसेफचे वडील शुक्रवारी बाहेरगावी, तर आई शेतात गेली होती. आसेफ घरीच होता. शेख दुपारी घरी आले असता आसेफ दिसून आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे शेख यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत माहिती दिली. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास शेरोडी पाझर तलावात एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक नारायण बुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, शेख व त्यांचे नातेवाइकही तेथे पोचले. त्यांनी आसेफला ओळखले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student death at waluj