रमजान ईदच्या मुहूर्तावर त्याने गुरुजीबद्दल व्यक्त केला आदरभाव

गणेश पांडे
रविवार, 17 जून 2018

एका विद्यार्थ्याने रमजान ईद निमित्त आपल्या शिक्षकाला आहेर करून आदरभाव व्यक्त केला. 

परभणी - लहानपणी ज्या गुरुजीने हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवले, संस्कार दिले, त्यांच्या विषयीचा असलेला आदरभाव काळजाच्या कोपऱ्यात पक्का वसलेला असतो. हाच आदरभाव एका विद्यार्थ्याने रमजान ईद निमित्त आपल्या शिक्षकाला आहेर करून व्यक्त केला. 

पूर्णा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १९७८ साली सय्यद पाशा अहमद तांबोळी हा शिकत होता. चाळीस वर्षाच्या काळाच्या तो मोठा झाला. आज तो मुंबई येथे व्यावसायिक म्हणून स्थिरावलाही. परंतु लहानपणी ज्या गुरूजीने त्यास जीव लावला प्रेम देत शिकविले त्यांना भेटण्याची त्याची आंतरिक इच्छा व ओढ होती रमजान ईद निमित्त तो पूर्णा आला होता. सध्या आपले आवडते गुरूजी रावसाहेब जोगदंड कोठे आहेत कसे आहेत याचा शोध त्याने घेतला. पाशा तांबोळी यांनी त्यांचे बंधू महेमूद तांबोळी यांना सोबत घेवून परभणीतील आचार्य नगर गाठले. ऐंशी वर्षीय गुरूजीला पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याच्या बालपणीच्या आठवणीत गुरूजी ही रमले. त्याने डब्बा भरून ईद निमित्त शीरखुर्मा आणला होता. त्याने आपल्या हाताने गुरूजीला भरवला. रावसाहेब गुरुजी व त्यांच्या पत्नी इंदिरा यांना नवे कपडे रूपी भेट देवून सत्कार ही त्याने केला. तुमच्या रुपात मला परमेश्वर दिसतो हे विनयाने बोलताना पाशा तांबोळी भारावून गेला.
खरच आज गुरू शिष्यांच्या नात्यात कमालीची औपचारिकता आल्याचे सर्वत्र दिसते. तेथे जात धर्माच्या संकुचित भिंती पाडण्याची क्षमता असलेले हे नाते किती श्रेष्ठ आहे. याचा प्रत्यय या घटनेवरून येतो .

मी माझ्या नोकरीत असताना दहावेळा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मला प्रस्ताव पाठविणेबाबत वरिष्ठांचे पत्र आले. परंतु मी नकार दिला. अध्यापनाचे चांगले काम करणे व विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करणे यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. ही माझी धारणा होती आज चाळीस वर्ष झाली तरी पाशा सारखे विद्यार्थी मला विसरत नाही. आदर्श शिक्षक पुरस्कार यापेक्षा मोठा असतो काय? - रावसाहेब जोगदंड गुरूजी आचार्य नगर, परभणी
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: student expressed respect for Guruji at the occasion of Ramadan eid