शेतात गव्हाला पाणी देताना पाय घसरला, विहिरीत पडून दहावीत शिकणाऱ्या आनंदचा मृत्यू

दीपक सोळंके
Friday, 25 December 2020

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शेतात पेरलेल्या गव्हाला पाणी देण्यासाठी जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दहावीत शिकणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील कुंभारी येथे शेतात पेरलेल्या गव्हाला पाणी देण्यासाठी जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दहावीत शिकणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.23) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. आनंद संतोष साळवे (वय 16) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुंभारी येथील संतोष उर्फ मच्छिंद्र साळवे हे त्यांचा मुलगा आनंद याच्यासह बुधवारी रात्री त्यांच्या शेतात पेरलेल्या गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी जात असताना वाटेतील एका विहिरीत आनंद याचा पाय घसरून तो विहिरीत पडला.

 

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

 

यावेळी संतोष साळवे यांनी आरडाओरड करून लगेच गावातील इतर लोकांची मदत घेतली व तात्काळ त्याला विहिरी बाहेर काढून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गुरुवारी (ता.24) शवविच्छेदन करून कुंभारी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भोकरदन पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे. 

 

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यातील चोरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात, पोलिसांकडून शोध सुरु

 

गावावर शोककळा
आनंद हा भोकरदन येथील न्यू हायस्कूलमध्ये 10 च्या वर्गात शिकत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Falled In Well And Died Jalna News