उस्मानाबाद - पालकाच्या आर्थिक विवंचनेतून विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

येडशी येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या लवटे वस्तीत लक्ष्मण काशीनाथ लवटे यांचे घर आहे. त्यांचा मुलगा जीवन हा जनता विद्यालयात इयत्ता दहावीला होता.

येडशी (जि. उस्मानाबाद) - आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेतून येथे एका विद्यार्थ्याने घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जीवन लक्ष्मण लवटे (वय 16) असे मृताचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (ता. सहा) सकाळी उघडकीस आली. 

उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या लवटे वस्तीत लक्ष्मण काशीनाथ लवटे यांचे घर आहे. त्यांचा मुलगा जीवन हा जनता विद्यालयात इयत्ता दहावीला होता. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण यांच्या डोक्‍यावर शस्त्रक्रिया झाली.

त्यासाठी सातत्याने पैशाची चणचण जाणवत होती. शिवाय जीवनच्या शिक्षणासाठी लागणारे पैसेही कुटुंबीयांकडे नव्हते. लवटे कुटुंबीयांकडे दीड एकर शेती आहे. कोरडवाहू असल्याने सातत्याने आर्थिक ओढाताण होत होती. यामुळे आर्थिक विवंचनेतून जीवनने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस निरीक्षक बी. बी. नाईकवाडी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. राम लक्ष्मण लवटे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 
 
गळफास लावून मजुराची आत्महत्या 
औरंगाबाद :
मजुराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) दुपारी सव्वादोनच्या सुमारास बौद्धनगर भागात उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महेंद्र तुकाराम थोरात (वय 45, रा. जवाहर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी स्वयंपाक खोलीतील छताच्या लाकडी बल्लीला उपरण्याद्वारे गळफास घेतला. हा प्रकार
कुटुंबीयांच्या लक्षात येताच ते हादरले. घटनेनंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. महेंद्र यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास जमादार डी. जी. नरवाडे करीत आहेत. 

हेही वाचा : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे आयुष्यावर दरोडा! 
 

रिक्षाचालकाची आत्महत्या 
औरंगाबाद :
मुकुंदवाडीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणाऱ्या रिक्षाचालकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. पाच) पाचच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, परमेश्‍वर निवृत्ती वाडेकर (वय 35, रा. मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर नातेवाइकांनी
परमेश्‍वर यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टारांनी त्यांना मृत घोषित केले. परमेश्‍वर यांना दारूचे व्यसनही होते.

गत अनेक दिवसांपासून ते व्याधीने त्रस्त होते. नातेवाइकांनी त्यांच्यावर उपचारही केले होते; पण परमेश्‍वर यांनी व्यथेतून आत्महत्या केली असावी असे नातेवाइकांकडून सांगण्यात आल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student suicide At Yedasi