ऑनलाइनऐवजी विद्यार्थी रमले शेतीकामात

प्रकाश ढमाले
शनिवार, 11 जुलै 2020

सुटीचा काळ घरीच गेला. या काळात विद्यार्थ्यांनी पेरणीपूर्व मशागत, पेरणीच्या कामांमध्ये पालकांना सहकार्य केले; मात्र आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा कालावधी सुरू झाला; पण शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शेतात चकरा सुरूच आहेत.

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा, उन्हाळी सुटीचा काळ घरीच गेला. या काळात विद्यार्थ्यांनी पेरणीपूर्व मशागत, पेरणीच्या कामांमध्ये पालकांना सहकार्य केले; मात्र आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा कालावधी सुरू झाला; पण शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शेतात चकरा सुरूच आहेत. विद्यार्थीही शेतीकामांमध्ये रमल्याचे दिसत आहेत. 

जून महिन्यामध्ये शाळा सुरू होताना आपल्याला नवीन वर्गात प्रवेश मिळणार, नवीन मित्र, नवीन पुस्तके मिळणार, नवीन शिक्षक मिळणार या आनंदाने विद्यार्थी भारावून जातात; मात्र जून महिना संपला तरी शाळेची घंटा वाजत नसल्याने विद्यार्थ्यांचा दिवस शेतातच जात आहे.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

ग्रामीण भागात तशी शेती कामे विद्यार्थ्यांना नवीन नाही. दरवर्षी सुट्यांमध्ये, पेरणीच्या, मजुरांच्या टंचाई काळात चिमुरडे विद्यार्थी आपल्या पालकांना शेतीकामात मदत करीतच असतात; मात्र यावर्षी कोरोनामुळे अधिकचा वेळ शेतात कामे करण्यातच गेला. शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात असले, तरी ग्रमीण भागात मात्र ऑनलाइनचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांची भिस्त ही शाळेवरच अवलंबून आहे. सध्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हाती वही, पुस्तकांऐवजी खते, खुरपे, जनावरांची दोर आदी दिसत आहे. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

शासनाने शाळेऐवजी ऑनलाइन शिक्षण द्यावे हा निर्णय घेतला; मात्र ग्रामीण भागामध्ये अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. काहींकडे असला तरी त्याचा वापर करता न येणे, मुलांच्या हातात न देणे, शेतीकामातून वेळ नसणे, नेटवर्किंग अडचण आदींमुळे ग्रामीण भागातील हे प्रमाण केवळ दहा ते पंधरा टक्केच दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासूनही दूर राहावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता यावे, यासाठी अनेक पालकांना मोबाईल फोन विकत आणावा लागला. शिवाय मोबाईलसाठी इंटरनेटसाठी डाटा पॅक रिचार्ज करावे लागत आहे. आर्थिक टंचाईमुळे नवीन खर्च परवडत नसल्याने पालकही त्रस्त आहेत.  
- विठ्ठल खेकाळे, मोबाईल शॉपीचालक 

शासकीय आदेशानुसार आम्ही शाळा सुरू केली; मात्र विद्यार्थ्यांना पाचारण करू शकत नाही. यामुळे वर्गवारी ग्रुप तयार करून ऑनलाइन शिक्षण देत आहोत; मात्र याला फार कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्गाची पुस्तके वाटप केली आहेत. त्यातून पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा व काही अडचणी असल्यास ग्रुपवर शेअर कराव्यात, असे नियोजनही केले आहे. 
- डी. बी. निकम, मुख्याध्यापक 

शाळा शाळाच असते. ज्ञानाचे माहेरघर असते. शाळेविना शिक्षण घेणे सुलभ वाटत नाही. शिक्षकांचे शिकवणे व पालकांचे शिकवणे यात मोठा फरक आहे. कोरोनाचे संकट दूर जावो आणि आमची शाळा सुरू होवो, असे वाटते. 
- आदित्य ढमाले, विद्यार्थी 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student work in farm