सेल्फीच्या मोहापायी धबधब्याजवळ स्टंटबाजी

सचिन चोबे
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सर्वत्र श्रावणधारा कोसळत असताना अजिंठा लेणीचा परिसरही निसर्गाच्या विविध रंगांनी खुलला आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांना लेणीचा परिसर पर्यटनासाठी खुणावत आहे. हौशी पर्यटक या परिसरात निसर्गाचा आनंद घेताना जिवावर उदार होऊन डोंगरकड्यांच्या जवळ धोकादायक पद्धतीने सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.

सिल्लोड (जि.औरंगाबाद)  : सर्वत्र श्रावणधारा कोसळत असताना अजिंठा लेणीचा परिसरही निसर्गाच्या विविध रंगांनी खुलला आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांना लेणीचा परिसर पर्यटनासाठी खुणावत आहे. हौशी पर्यटक या परिसरात निसर्गाचा आनंद घेताना जिवावर उदार होऊन डोंगरकड्यांच्या जवळ धोकादायक पद्धतीने सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.

अजिंठा लेणीतील सप्तकुंड येथील धबधब्यावर तरुण मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी गर्दी करीत आहेत. लेणीच्या माथ्यावर असलेल्या लेणापूर (ता. सोयगाव) येथून अजिंठा लेणीत कोसळणाऱ्या सप्तकुंड धबधब्याचे पर्यटकांसह परिसरातील नागरिकांनाही मोठे आकर्षण आहे. लेणापूर येथील डोंगरातील खडकाळ वाटेतून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी सप्तकुंड धबधब्यातून लेणीत प्रवाहित होते. व्ह्यू पॉइंट येथून लेणीत हिरवाईने नटलेल्या पायवाटेने हौशी पर्यटक पायी उतरत असतात.

पायी उतरताना मध्यभागीच सप्तकुंड धबधब्याचे मनमोहक दृश्‍य पर्यटकांना आकर्षित करते. या धबधब्याजवळ सुरक्षेच्या दृष्टीने सोयीसुविधा तोकड्याच असून, उत्साही तरुण जिवावर उदार होऊन या धबधब्याच्या टोकाशी उभे राहून सेल्फी घेत असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. मुसळधार पावसाने डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. वाहणाऱ्या पाण्यामुळे या परिसरातील दगडेही शेवाळली आहेत. गटागटाने येणारे तरुण धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षिततेची कुठलीही काळजी न घेता गमतीजमती करीत या पाण्यात व धबधब्याजवळ मस्तीसह फोटो सेशन करतात. तरुणांची ही स्टंटबाजी त्यांच्या जिवावर उठू शकते. सप्तकुंड धबधबा काळ्याशार, टोकादार दगडांमधून प्रवाहित होतो. सेल्फी काढण्याच्या मोहामुळेही स्टंटबाजी मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.

सुरक्षारक्षकांची नेमणूक गरजेची

पर्यटन महामंडळाने पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करून तरुणांना या धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करणे आवश्‍यक आहे. अगदी सहजरीत्या या ठिकाणी जाता येत असल्याने पर्यटन महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असला तरी याकडे काणाडोळा करून हौशी पर्यटक जिवावर उदार होऊन फोटोसाठी स्टंटबाजी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stunts near falls for selfi