संग्रामनगरात आता रेल्वेरुळाखाली  भुयारी मार्ग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - सातारा-देवळाई परिसराला जोडणाऱ्या संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील रेल्वेरुळाखालून आता भुयारी मार्ग होणार आहे. या कामाचे रविवारी (ता. १२) सायंकाळी पाच वाजता भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून, यामुळे जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांची गैरसोय टळणार आहे. 

औरंगाबाद - सातारा-देवळाई परिसराला जोडणाऱ्या संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील रेल्वेरुळाखालून आता भुयारी मार्ग होणार आहे. या कामाचे रविवारी (ता. १२) सायंकाळी पाच वाजता भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून, यामुळे जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांची गैरसोय टळणार आहे. 

सातारा-देवळाईकडे शिवाजीनगर आणि दर्गा चौकाकडून जाता येते; मात्र यापैकी शिवाजीनगरातील रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडल्यास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारक संग्रामनगर उड्डाणपुलाचा वापर करतात. दरम्यान, या उड्डाणपुलाच्या परिसरात असलेल्या वसाहतींमध्ये जाण्यासाठी अनेकजण उड्डाणपुलावरून राँगसाइडने जात-येत होते. परिणामी, येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत होते. ते टाळण्यासाठी या परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक कायमचेच बंद करण्यात आले. त्यामुळे उड्डाणपुलाच्या परिसरात असलेल्या वसाहतींमधील नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास सहन करावा लागत आहे. जवळचा रस्ता सोडून त्यांना वळसा घालून जावे लागत आहे. हा त्रास या भुयारी मार्गामुळे दूर होणार आहे. शिवाय बीड बायपास परिसराकडे जाणेही सोयीचे होणार आहे. 

साडेपाच कोटींची तरतूद संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरातील रेल्वे गेट नंबर ५४ जवळील या भुयारी मार्गासाठी साडेपाच कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

शहरासोबतच विकसित होणाऱ्या बीड बायपास येथे जाण्यासाठी तसेच शहरात येण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपूल हा एकमेव चांगला मार्ग आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिवाय उड्डाणपुलाच्या आजूबाजूच्या रहिवाशांना बायपासला जाण्यासाठी पुलावरच यावे लागते. अनेकदा विरुद्ध दिशेने पुलावर त्यांची वाहने येत असल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण होते; मात्र या भुयारी मार्गामुळे परिसरातील वाहनधारकांना बायपासला जाणे सोपे होईल.
- सोपान कदम, स्थानिक रहिवासी.

असे असेल काम  
या भुयारी मार्गाची उंची तीन मीटर तर रुंदी चार मीटर असणार आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सातारा, बीड बायपास भागातील नागरिकांनी अनेकवेळा या मार्गासाठी थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता.  

या रहिवाशांना सर्वाधिक त्रास
बी. अँड सी. कॉलनी, देवेंद्र कॉलनी, सेनानगर, शिवकृपा कॉलनी, दिशानगरी, झेड गॅलेक्‍सी, राजगुरूनगर, स्वप्नपूर्ती, अथर्व क्‍लासिक यांसह अन्य भागांतील नागरिकांनाही भुयारी मार्ग नसल्याने फटका बसत असून आता त्यांची गैरसोय दूर होईल.

Web Title: subway is going through the railway line near the sangramnagar flyover in aurangabad