esakal | Success Story: ३० गुंठ्यात १० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात
sakal

बोलून बातमी शोधा

success story

शेतात पिकवले तर त्याला योग्य भाव मिळत नाही, बाजारपेठही मिळत नाही. असे नेहमीचे रडगाने शेतकऱ्यांचे असते

Success Story: ३० गुंठ्यात १० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट देवळा (ता.अंबाजोगाई) येथील प्रयोगशील शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी साध्य केले आहे. त्यांनी फक्त ३० गुंठ्यात उत्पादित केलेले रंगीत (पिवळे व लाल) १० टन टरबूज पुण्याहून दुबई व बेंगलोरला गेले आहेत. यातून त्यांनी मेट्रोसिटी मधील माॅलची बाजारपेठ मिळवली आहे.

शेतात पिकवले तर त्याला योग्य भाव मिळत नाही, बाजारपेठही मिळत नाही. असे नेहमीचे रडगाने शेतकऱ्यांचे असते. परंतू शेतकऱ्यांने चांगल्या प्रतीचे पीक उत्पादित केले तर त्यासाठी बाजारपेठ शोधण्याची गरज पडत नाही. हे रविंद्र देवरवाडे यांनी दाखवून दिले आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून मोठ्या शहरात याला चांगली मागणी आहे.

शिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा

असे घेतले उत्पादन-

श्री. देवरवाडे यांनी नोन यु सिड्स अरोही व विशाला वानाचे रंगीत टरबूजाचे बियाणे आणून त्याची रोपे तयार केली. अगदी हिवाळ्यातच (नोव्हेंबर) महिन्यात याची त्यांनी लागवड केली. वरतून हिरवे आणि आतून पिवळे याची ४०० रोपे व वरून पिवळे आणि आतून लाल अशी पाच हजार रोपे लागवड केली. तेही फक्त ३० गुंठे क्षेत्रात, दोनच महिन्यात या फळाची तोड होऊन आता बाजारात जाण्यास सुरू झाले आहेत.

शेतावरच खरेदी-

देवळ्यात उत्पादित झालेले हे टरबूज साधारण अडीच ते किलो ते ५ किलो वजनाचे फळ आहे. हिवाळ्याच्या बदलत्या हवामानात हे फळ येऊ शकणार नाही. असा अंदाज होता. परंतू श्री. देवरवाडे यांनी ही आव्हाने पेलत ता साध्य करून दाखवले. महाराष्ट्रातही असा उत्तम प्रतीचे रंगीत टरबूज येऊ शकते हे त्यांनी या प्रयोगातून दाखवून दिले. त्यांच्या या फळाची मुंबीच्या रिलायन्स मॉलने शेतावर येऊन याची खरेदी केली. 

हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१.७० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

मिश्र शेती-

या टरबुजाच्या उत्पादनासाठी देवरवाडे यांनी मिश्र शेतीचा प्रयोग केला. त्यात रासायनिक, सेंद्रिय व जैविक असे खत व किटकनाशकांचा फवारणीसाठी वापर केला.  यासाठी त्यांना कृषी सहायक श्री. मागाडे व अशोक गाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. राज्य शासनाचा विकेल ते पिकेल असे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत श्री. देवरवाडे यांनी हा प्रयोग यशस्वी केला. त्यांना यातून दोन महिन्यात एक लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळणार आहे. यातून त्यांनी करार शेतीचेही ध्येय साध्य केले आहे.

शेतकरी रविंद्र देवरवाडे हे सकाळ ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी आहेत. शेती व्यवसाय हा दुप्पट दाम देणारा आहे. या व्यवसायाकडे तरुण पिढीने आपल्या ज्ञान कोशल्याचा वापर करून आर्थिक उन्नती करून आत्मनिर्भर व्हावे अशी अपेक्षा रविंद्र देवरवाडे यांनी व्यक्त केली.

(edited by- pramod sarawale)

loading image