वय 74 वर्षे; तरीही जिद्दीने यशस्वी शेती

मधुकर कांबळे
सोमवार, 6 मे 2019

नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली.

औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे सुलतानपूर येथील बाबूराव पांडुरंग पाटील आणि कांताबाई पाटील या जिद्दी, मेहनती दांपत्यांची.

सुलतानपूर शिवारात राहणारे बाबूराव वीज मंडळातून लाइनमन म्हणून 2005 मध्ये निवृत्त झाले. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पत्नी कांताबाई शिवणकाम करून आर्थिक हातभार लावत होत्या. पाटील दांपत्याचा मोठा मुलगा केमिकल इंजिनिअर असून, त्याची स्वत:ची कंपनी आहे. दुसरा शिक्षक, तर तिसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो ऑस्ट्रेलियात आहे.

निवृत्तीनंतर बाबूराव यांनी 2006 मध्ये चार एकर शेती घेतली. ते घर बांधून शेतातच राहतात. सिंचनासाठी दोन विहिरी असून, पूर्ण शेती ठिबकवर आहे. साडेतीन एकरांत मोसंबीचा बाग असून, त्यात शेवगा, पपई, कांदे, मेथी, लसूण, वांगी, मिरची अशी अंतरपिके घेतात. बांधावर नारळाची नऊ झाडे लावली. घराजवळील अर्ध्या एकरात फणस, ऍपल बोर, लिंबू, आवळा, पेरू, सीताफळ, रामफळ, कढीपत्ता, जांभळाची झाडे आहेत.

नोकरीतून वर्षाला जेवढे पैसे मला मिळायचे त्यापेक्षा दुप्पट पैसे आता शेतीतून कमावत आहे. दुचाकीवरून शहराजवळची हॉटेल्स, ढाब्यांवर, तर कधी मंडीमध्ये शेतीमाल विकायला नेतो. मजूर लावण्याच्या कधी भानगडीत पडत नाही. स्वत: दोघे काम करतो. मदतीला छोटं टिल्लू ट्रॅक्‍टर आहे.
- बाबूराव पाटील

आम्ही कधीच मजूर लावला नाही. बागेची छाटणी करण्यापासून ते तण काढण्यापर्यंत सर्वच कामे आम्ही स्वत: करतो. शेतातील थोडीही जागा वाया जाऊ देत नाही. मिळेल त्या जागेत अंतरपीक म्हणून भाजीपाला पिकवतो.
- कांताबाई पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful Agriculture Baburao Patil Motivation