पाणीपुरवठ्यात अचानक सहा तासांचा शटडाऊन

माधव इतबारे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - जुन्या पाणीपुरवठा योजनेला लागलेली गळती बंद करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी (ता. सहा) अचानक सहा तासांचा शटडाऊन घेतला. या काळात पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहून जाणारे सुमारे 12 एमएलडी वाचणार आहे. तथापि, यामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

औरंगाबाद - जुन्या पाणीपुरवठा योजनेला लागलेली गळती बंद करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी (ता. सहा) अचानक सहा तासांचा शटडाऊन घेतला. या काळात पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहून जाणारे सुमारे 12 एमएलडी वाचणार आहे. तथापि, यामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 700 मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनला फारोळ्याजवळ मोठी गळती लागल्याचे मंगळवारी (ता. पाच) समोर आले होते. या गळतीतून रोज सुमारे 11 ते 12 एमएलडी पाणी वाहून जात होते. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला होता. गळती थांबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. पाच) प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे बुधवारी अचानक शटडाऊन घेण्यात आला. सकाळी अकरापासून 700 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बंद करण्यात आली. पाइपलाइनमधील पाणी संपल्यानंतर अर्ध्या तासाने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ते सायंकाळी सहा वाजता संपले. 

शटडाऊनच्या काळात ढोरकीन येथील व्हॉल्व्हही बदलण्यात आला. या दुरुस्तीमुळे वाया जाणारे 11 एमएलडी पाणी वाचणार आहे. दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बी. डी. घुले, एम. एम. बाविस्कर यांच्यासह कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर परिश्रम घेतले. अचानक घेतलेल्या शटडाऊनमुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळित होणार असून, नियोजित वेळेपेक्षा उशिराने पाणी येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपूर्ण पावसाळा कोरडाठाक असलेल्या हर्सूल तलावात परतीच्या पावसाने पाणी आले होते. काही दिवसांपूर्वी 11 फुटांपर्यंत असलेली पाणीपातळी आता 18 फुटांवर गेली आहे. तलावात गेल्या आठवड्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने चार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. 

दरम्यान, हर्सूल तलावाची पाणी साठवण क्षमता 28 फूट एवढी आहे. मात्र, कमी पर्जन्यमानामुळे या तलावात काही वर्षांत पाणीच आले नव्हते. यंदाही पावसाळा संपत आला तरी हर्सूल तलावात पाण्याचा थेंब नव्हता. मात्र दोन आठवड्यापूर्वी तलावात दोन फूट पाण्याची नोंद झाली होती. आता ही पाणीपातळी 18 फुटांपर्यंत वाढली आहे. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे तलावातून शहराला पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली होती; मात्र परिसरातील नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden six-hour shutdown on water supply