अंबड तालुक्यात परतताहेत ऊसतोड कामगार

दिलीप पवार 
Monday, 4 May 2020

लॉकडाउनमुळे अनेक कामगार ठिकठिकाणी अडकले. शासनाने कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली असली, तरी रस्त्यामध्ये अनेक अडचणींशी त्यांना सामना करावा लागला. अजूनही ऊसतोड कामगारांचा प्रवास सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत तब्बल १ हजार ५ ऊसतोड कामगार परतले असल्याचा शासकीय आकडा आहे; मात्र याशिवाय मोठ्या संख्येने कामगार आल्याचेही बोलले जात आहे.

अंकुशनगर (जि.जालना) - मागील वर्षीच्या बाहेरजिल्ह्यांतील विविध साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसतोडीसाठी गेलेले अंबड तालुक्यातील ऊसतोड कामगार आता कारखाने बंद होत असल्यामुळे परतू लागले आहेत. लॉकडाउनमुळे येणाऱ्या अडचणींशी सामना करीत अंबड तालुक्यात एक हजार ऊसतोड मजूर गावाकडे पोचले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या प्रसंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जात असतात. ही संख्या शहागड, वडीगोद्री या भागांमध्ये जास्त आहे.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

साधारणतः आठ महिन्यांचा ऊसतोडीचा हंगाम पूर्ण करून हे ऊसतोड कामगार उन्हाळ्यामध्ये परत आपल्या गावी येत असतात. लॉकडाउनमुळे अनेक कामगार ठिकठिकाणी अडकले. शासनाने कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली असली, तरी रस्त्यामध्ये अनेक अडचणींशी त्यांना सामना करावा लागला. अजूनही ऊसतोड कामगारांचा प्रवास सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत तब्बल १ हजार ५ ऊसतोड कामगार परतले असल्याचा शासकीय आकडा आहे; मात्र याशिवाय मोठ्या संख्येने कामगार आल्याचेही बोलले जात आहे. सर्व कामगारांना त्यांच्या घरी किंवा अनेक गावांमधील शाळांत क्वारंटाइन करण्यात आले.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला काम

परतलेल्या ऊसतोड कामगारांची संख्या ही प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय वडीगोद्रीअंतर्गत २६५, जामखेडला १६८, धनगर पिंपरीला १७३, गोंदीत १२६, सुखापुरीला ७७ व शहागडला १९६ अशी आहे. या कामगारांशिवाय विविध भागांमधून येणाऱ्या प्रवाशांचा आकडाही मोठा आहे. सध्या अंबड तालुक्यात बाहेरून आलेल्या ६ हजार १४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. लॉकडाउन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५ हजार ५९५ जणांचा क्वारंटाइन कालावधी संपुष्टात आलेला असल्याची माहिती अंबड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane workers returning to village