ऊसतोड कामगारांना मिळणार बीड झेडपीकडून मोफत किराणा किट 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

ऊसतोडणी मजुरांच्या हाल - अपेष्टा संपायला तयार नाहीत. परंतु, आता या मजुरांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून या क्वारंटाइन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला.  

बीड - सहा महिने ऊसतोडणी करताना हालअपेष्टा सहन करणाऱ्या ऊसतोड मजुरांना लॉकडाउनच्या काळात तर अनेक संकटांना सामोरे जावे लागले. आता परतल्यानंतरही या मजुरांना २८ दिवस स्वत:च्या घराऐवजी शेतात किंवा शाळेत राहावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या हाल - अपेष्टा संपायला तयार नाहीत. परंतु, आता या मजुरांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून या क्वारंटाइन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला.  

जिल्हा परिषदेच्या या एक कोटी ४३ लाख रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे. यंदा ऊसतोडणी हंगाम संपण्याच्या तोंडावरच कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कामगारांना तर अवकाळी पावसाने अनेक अडचणी आल्या. दरम्यान, गावाकडे येण्यासाठी ऊसतोड मजूर विनवण्या करत होते. अखेर शासनाने ऊसतोड कामगारांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. गावी परत येत असतानाही या मजुरांना अडचणी आल्या. दरम्यान, परतलेल्या मजुरांना २८ दिवस स्वत:च्या घराऐवजी शेतात किंवा शाळेत राहावे लागणार आहे. त्यामुळे आता या मजुरांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

जिल्ह्यात मागच्या दहा दिवसांत साधारण ३५ हजार ऊसतोड मजूर परतले आहेत. त्यांच्यासमोर या संकटाने तोंड काढलेले आहे. त्यामुळे या मजूरांना दिलासा मिळावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेने दिलासा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये या मजुरांना किराणा किट देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागील चार दिवसांपासून मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्याच्या प्रस्तावाबाबत अभ्यास करून हा प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाला पाठविला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे या प्रस्तावास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. ता. १७ तारखेच्या शासन निर्णयानुसार अधिकृत नोंदणी करून परतलेल्या ऊसतोड मजुरांची कुटुंबसंख्या निश्चित करून, त्या - त्या ग्रामपंचायतीला निधी वर्ग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत हे किराणा किट वाटप करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

ग्रामपंचायतींमार्फत घरपोच वाटप 
गावांमध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर चार गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. आतापर्यंत नोंदणीकृत जिल्ह्यात आलेल्या; तसेच अजूनही परत यायला सुरूच असलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ग्रामपंचायतनिहाय दर व कुटुंबसंख्या निश्चित करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane workers will get free grocery kits from Beed ZP