मुलाच्या छळाला कंटाळून  मातेने कवटाळला रेल्वेरूळ! 

file photo
file photo

संग्रामनगर रेल्वेगेटवर नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण 

औरंगाबाद : मुलाच्या त्रासाला कंटाळून मातेने आत्महत्येचा निर्णय घेतला. डोके जमिनीवर आदळून ही माता थेट रेल्वेरुळावर आली. सतर्क नागरिकांनी रेल्वे इंजिनसमोरून या महिलेला ओढून बाजूला केल्याने अनर्थ टळला. मात्र इथे नव्हे तर मी कुठेही जीव देईल, अशी उद्विग्नता व्यक्त करणाऱ्या महिलेचे मतपरिवर्तन करून तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. संग्रामनगर रेल्वेरुळाजवळ सोमवारी (ता. 16) दुपारी हा प्रकार घडला. 

सुषमा (रा. सातारा परिसर, नाव बदलले आहे) या महिलेला अमोल आणि अजय अशी दोन मुले आहेत. यातील अमोल हा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे. त्याने चांगल्या कंपनीतील नोकरी सोडली, तर अजय हा एका दुचाकी गॅरेजवर काम करतो. पती खासगी कंपनीत तोकड्या वेतनावर काम करतात. 

दारुच्या व्यसनाने वाताहत 

अमोलने नोकरी सोडल्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले. तो नोकरीच्या शोधात फिरत आहे. हुशार असूनही दारूच्या व्यसनामुळे त्याला कुणी नोकरी देत नाही, अशी परिस्थिती आहे. एकूणच कुटुंबामध्ये आर्थिक ताणतणाव आहेत. आर्थिक गणित बिघडल्याने अमोल दररोज आईशी भांडण करून तिला मारहाणही करतो, कधी दारूच्या नशेत वडिलांनाही मारहाण करतो, पत्नीलाही मारहाण करतो, असे त्याचे वर्तन आहे. त्याच्या वर्तनामुळे पत्नीही सातत्याने घर सोडण्याचा विचार करते. दररोज वादविवादाचे प्रसंग येत असताना सून मात्र सासूला जीव लावण्याचा प्रयत्न करून धीर देत असे. 

जिवे मारण्याचा प्रयत्न 

अमोलने काही दिवसांपूर्वी घरात एक लाकडी दांडा आणून ठेवला. या दांड्याने तुला मारून टाकणार, असे तो सारखा धमकावत असल्याने आई सुषमाबाईला मात्र धडकी भरली होती. शेवटी या त्रासाला कंटाळून सुषमाबाईने जीवनयात्रा संपवण्याच्या उद्देशाने घरात सर्वांच्या समोर डोके आदळून घेतले. त्यानंतर त्या थेट आत्महत्या करण्यासाठी जखमी अवस्थेतच संग्रामनगर रेल्वेगेटजवळ पोचल्या. 
नागरीकांचा मदतीचा हात 

सुषमाबाई या रेल्वे रुळाजवळ आल्यानंतर संशयामुळे ही बाब येथील विनोद सोनवणे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांना सांगितली. गोर्डे यांनी तातडीने धाव घेतली तेव्हा ही महिला अत्यंत उद्विग्न अवस्थेत आत्महत्या करण्यावर ठाम होती. थोड्या वेळातच चिकलठाण्याच्या दिशेने एक रेल्वे इंजिन धडधडत येत होते. माझा जगून काहीही फायदा नाही, मला हात लावू नका, असे ती म्हणत होती. मात्र श्री. गोर्डे यांच्यासह नंदा सोजे, नेत्रा जोशी, मीनाबाई किर्तीकर, पद्माबाई तोंबडकर, सुरेश दाभाडे, कैलास भातपुडे, शिवानंद वाडकर यांनी रेल्वे इंजिन जवळ येण्यापूर्वीच महिलेला धरून ओढले. त्यानंतर काही क्षणांत रेल्वे इंजिन धडधडत निघून गेले. 

मुलांना करून दिली कर्तव्याची जाणीव 

सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले. महिलेची समजूत काढत तिला सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस जमादार विठ्ठल पोटे, सुनील कराळे, कारभारी नलावडे यांनी महिलेची समजूत घातली. मुलांना बोलावून घेतले. त्यांनाही कर्तव्याची जाणीव करून देत आईला मुलांच्या स्वाधीन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com