करिअरसह "कॅरेक्‍टर बिल्डिंग'कडे लक्ष द्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - राजकारण वाईट असते, असे समजायचे कारण नाही. मुलींनी कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवावे; पण अभ्यासाबरोबरच खेळ आणि अवांतर वाचनही तितकेच महत्त्वाचे असते, हे ध्यानात घ्यावे, अशा शब्दांत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. पाल्याच्या "करिअर बिल्डिंग'सोबतच "कॅरेक्‍टर बिल्डिंग'कडेही पालक, शिक्षकांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शताब्दीपूर्ती समारंभाला सोमवारी आवर्जून उपस्थित असलेल्या सुमित्रा महाजन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना वडिलकीचे सल्ले देतानाच पालकांचेही कान टोचले. ""आजकाल बसस्टॉपवरसुद्धा मुलांच्या आया त्यांच्या टक्केवारीबद्दल चर्चा करताना दिसतात. टक्केटोणपे खाण्याऐवजी टक्केवारीच्या मागे लागलेली मुले आयुष्यात "टक्के' कमावतील. "बाळा, मोठा होऊन मोठ्ठा बंगला बांध, मोठी गाडी घे,' असे स्वप्न दाखविणाऱ्या आईचा एखादा इंजिनिअर मुलगा गावातील पूल बांधायचे कंत्राट घेईल. पूल होणारच नाही; पण मुलाचा आईने सांगितलेला मोठा बंगला उभा राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या "करिअर बिल्डिंग'सोबतच त्यांच्या "कॅरेक्‍टर बिल्डिंग'कडेही पालक, शिक्षकांनी लक्ष द्यावे,'' असे महाजन म्हणाल्या. 

""आपण जे काही आहोत ते आपल्या शाळेमुळे आणि शिकविण्याऱ्या शिक्षकांमुळे आहोत, हे कधीही विसरू नका. आपल्या मातीशी नाळ जोडलेली असूद्या,'' असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष जवाहरलाल गांधी आदी उपस्थित होते. 

Web Title: sumitra mahajan in aurangabad