विवाहाचा मुहूर्त, उन्हाचा ताप  अन्‌ उमेदवारांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लातूर - लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १९) मतदान झाले. विवाहाचा मुहूर्त, उन्हाच्या तापामुळे लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचा टक्का मात्र कमी राहिला. मतदान कमी झाल्याने उमेदवारांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. शहरातील मतदान केंद्रावर कोठेही मतदानाच्या मोठ्या रांगा दिसून आल्या नाहीत. बुधवारी ४० डिग्री सेल्सिअस तापमान राहिल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. 

लातूर महापालिकेच्या १८ प्रभागांतील ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले. शहरात ठिकठिकाणी ४०१ केंद्रांवर हे मतदान झाले आहे. यावेळेस वाढते तापमान लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानासाठी ११ तासांची वेळ दिली होती. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी ६.३० वाजता संपले. सकाळी ७.३० ते ११ पर्यंत उन्हाची तीव्रता नसते. त्यामुळे या वेळेतच जास्त मतदान होईल असे अपेक्षित होते; पण याच चार तासांत सरासरी आठ ते नऊ टक्केच मतदान झाले. उन्ह जसे वाढू लागले तसे मतदान केंद्रही ओस पडल्याचे दिसून येत होते. एक-दोन मतदार येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते. सायंकाळी साडेचारनंतर मतदान केंद्रावर तुरळकच गर्दी राहिली. मतदानासाठी तासन्‌ तास उभे राहावे लागले, असे एकही मतदान केंद्र शहरात नव्हते. बुधवारी विवाहाचा मुहूर्त होता. याचाही परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी ४० डिग्री सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे अनेक मतदारांनी घरात बसणेच पसंत केल्याचे चित्र दिसले. नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांच्या नाकीनऊ आले. कमी मतदान झाल्याने उमेदवारांना मात्र याचा मोठा मनस्ताप झाला आहे. कमी मतदानाचा फायदा कोणाला व तोटा कोणाला, याची चर्चा मात्र आता सुरू झाली आहे. 

उकाड्याने कर्मचारी बेजार
आज उन्हाची तीव्रता अधिक होती. मतदारांसाठी सावलीची व्यवस्था काही ठिकाणी करण्यात आली होती; पण मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारची रात्र व बुधवारचा दिवस फॅनची व्यवस्था नसल्याने उकाड्यातच काढावा लागला. अनेक ठिकाणी मतदानाच्या वेळी हे कर्मचारी एका हाताने घाम पुसणे, वारे घेणे तर दुसऱ्या हाताने मतदानाची प्रक्रिया पार पाडताना दिसत होते.

Web Title: summer heat