वारे...पठ्ठ्या...! केवढे हे कौतूक...  पोलिस अधीक्षकांनी कडेवर घेत केला सत्कार

गणेश पांडे
Friday, 31 January 2020

परभणी शहरातील सारंग स्वामी विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी ओंकार दिलीप तिडके हा उत्तम दांडपट्टा चालवितो. लाठी - काठीचे प्रशिक्षण ही त्यांने उत्तम रित्या पूर्ण करत आहे. त्याची किर्ती पोलिस दलापर्यंत पोहचली.

परभणी : कोवळ्या वयात लाठी - काठी व दंडपट्याचे प्रशिक्षण घेवून चित्तथराक प्रात्यक्षिके आयपीएस अधिकाऱ्यांनाही स्वताच्या साहसाची भुरळ पाडणाऱ्या परभणीतील ओंकार तिडके (वय आठ) या चिमुकल्याचे पोलिस दलाच्यावतीने तोंडभरून कौतूक होत आहे. नुसते कौतूकाचे नाही तर चक्क पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ओंकार तिडकेला स्वताच्या दालनात आमंत्रित करून त्याला कडेवर घेत त्याचा सत्कारही केला.

परभणी शहरातील सारंग स्वामी विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारा विद्यार्थी ओंकार दिलीप तिडके हा उत्तम दांडपट्टा चालवितो. लाठी - काठीचे प्रशिक्षण ही त्यांने उत्तम रित्या पूर्ण करत आहे. त्याची किर्ती पोलिस दलापर्यंत पोहचली. नुकत्याच परभणी येथे झालेल्या पोलिस क्रीडा स्पर्धाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ओंकार तिडके यांने स्वतातील कला सादर केली. त्याच्या या साहासी खेळाला अवघे पोलिस दल भाळले. स्पर्धास्थळी ओंकार तिडके याचे कौतूक होत होते. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनीदेखील त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून ओंकार तिडकेचे कौतूक करून त्याच्या
साहासी खेळाची दखल घेतली. शुक्रवारी (ता.३१) पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ओंकारच्या वडील दिलीप तिडके यांना निरोप पाठवून ओंकारचा सत्कार करायचा आहे.

हेही वाचा -  प्रभाग, विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

पोलिसांनी धाडले निमंत्रण
आपण पोलिस अधीक्षक कार्यालयात यावे, असे निमंत्रण धाडले. सकाळी ठरलेल्या वेळी ओंकारसह त्याचे वडील  दिलीपराव तिडके यांच्यासह ओंकारचे प्रशिक्षक पांडूरंग अंबुरे, पत्रकार मंदार कुलकर्णी, बालाजी माने, मुंजाजी होरे, संभाजी बादड आदी उपस्थित होते. हे सर्वजण पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. पोलिस अधीक्षकांनी ओंकारला स्वताजवळ बोलावून घेत त्यांची विचारपुस केली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यादेखील आवर्जून उपस्थित होत्या. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे अत्यंत शिस्तशिर व कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून परिचित आहेत. परंतू, ओंकारच्या कामगिरीचे कौतूक करण्यासाठी त्यांनी त्याला सरळ स्वताच्या कडेवर उचलून घेत त्याचा सत्कार केला. पोलिस अधीक्षकांच्या या मृदु स्वभावाचे दर्शन घेवूनही उपस्थित अधिकारी व कर्मचारी देखील आश्चर्यात पडले.

हेही वाचा -  GOOD NEWS : नाट्य संमेलनाचा लातुरात होणार जागर

पांडूंरग अंबुरे यांच्याकडून प्रशिक्षण
ओंकार तिडके हा खानापूर परिसरात राहतो. त्याला लाठी - काठी व दांडपट्टयाचे प्रशिक्षण पांडूरंग अंबुरे यांच्याकडून मिळाले आहे. कमी वयात ओंकार तिडकेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police honored