'तो' अघोरी बाबा पसार 

'तो' अघोरी बाबा पसार 

औरंगाबाद - भूतबाधा व इतर तत्सम आजारांवर अघोरी प्रकारांनी उपचार करणाऱ्या, तसेच भीती दाखवून अंधश्रद्धाळू व्यक्तींचे शारीरिक व आर्थिक शोषण करणाऱ्या तांत्रिक बाबावर मंगळवारी (ता. 22) हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, पोलिस आता आपल्या मुसक्‍या आवळणार याची कुणकुण लागताच हा बाबा पसार झाला आहे. 

येथील हर्सूल गावात जम्मन ज्योती रोडवर गनी कादर पठाण नावाचा एक साठ वर्षीय तांत्रिक बाबा लोकांना झालेली भूतबाधा बाहेर काढणे, दुर्धर आजार बरे करणे, गुप्तधन शोधणे असे अघोरी प्रकार करीत होता. भूतबाधा व तत्सम अघोरी उपचार करण्यासाठी तो हजारो रुपयांची मागणी करीत असे. या तांत्रिक बाबावर जादुटोणाविरोधी कायदा कलम नं. 3 (2) नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सरला गाडेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक सय्यद बाबर, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण गाडगे, मीना बोरुडे यांनी अंनिसचे शहाजी भोसले, प्रशांत कांबळे व सुनील उबाळे यांच्यासह जम्मनज्योती रोडवरील दर्ग्यावर छापा मारला असता बाबा फरार झाल्याचे समजले. त्या दर्गा परिसरात मात्र असंख्य अर्धवट पेटलेले लिंबू सापडले. त्यानंतर ही टीम भोंदू तांत्रिक बाबाच्या पळशी गावी गेली; पण तेथेही तो सापडला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी ग्रामीण भागात पथक पाठविण्यात आले आहे. 

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या बाबाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या येथील कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला. तंत्रविद्या येत असल्याचे भासवत बाबा हातचलाखी करून अनेकांना गंडवीत होता, असे समोर आल्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले. 

अंनिसचे राज्य सचिव शहाजी भोसले यांच्या नेतृत्वात अतुल बडवे, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चौतमोल यांनी बाबाच्या हर्सूल येथील जमनज्योती भागातील दर्ग्यावर जाऊन सविस्तर माहिती एकत्र केली. त्यावेळी त्याच्या सर्व क्‍लृप्त्या आणि हातचलाखी हेरून त्याचे छायाचित्रणही करण्यात आले. त्याची गंडविण्याची पद्धत, अंधश्रद्धेतून लोकांची दिशाभूल करून भीती दाखवीत तो लोकांना फसवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात जाऊन कार्यकर्त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षकांकडे तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com