
घरातील व्यक्ती आजारी राहत असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य करण्याचा प्रकार तालुक्यातील नाईचाकूर येथे उघडकीस आला. दरम्यान साधारणतः चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खड्डा करुन त्यात पुजेचे साहित्य ठेवल्याचा प्रकार समोर आल्याने दोन महिला व एका पुरुषावर मंगळवारी (ता.तीन) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : घरातील व्यक्ती आजारी राहत असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य करण्याचा प्रकार तालुक्यातील नाईचाकूर येथे उघडकीस आला. दरम्यान साधारणतः चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खड्डा करुन त्यात पुजेचे साहित्य ठेवल्याचा प्रकार समोर आल्याने दोन महिला व एका पुरुषावर मंगळवारी (ता.तीन) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतची माहिती अशी की, नाईचाकूर येथे हैदर महेबुब मुल्ला यांच्या नावे पुनर्वसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरात कुणीही राहत नाही. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती मंगळवारी आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलिस पाटील बाळू स्वामी यांना सांगितली.
आईने मामाच्या मदतीने केला स्वतःच्या मुलाचा खून, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना
तेव्हा श्री. स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला. त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबु असे पुजाचे साहित्य पुजा करून पडलेले होते. तसेच बाजुस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजुचे खोलीमध्ये तीन कलताणी पोते, दोन लिंबु व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोणा करून पडलेले दिसले. या बाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपुस केली असता तिने सांगितले की, माझी उमरगा येथील बहीण नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला कोणीतरी सांगितले की, तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदुन त्यात नारळ, लिंबु पुजा करून टाका, तुमचा आजार बरा होईल असे सांगितले.
लातूरला चार पीडित महिलांची सुटका; लॉजवर छापा, वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे उघड
त्यानुसार मी स्वतः, माझी बहीण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज शौकत पटेल ता.२४ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदुन त्यामध्ये लिंबु नारळ व पुजा करणार होतो असे सांगितले. परंतू हा प्रकार अंधश्रद्धेतुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलिस पाटील श्री. स्वामी यांनी पोलिसांना कळविली. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, बीट अंमलदार दत्ता शिंदे व अन्य कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तैसिन मुल्ला, अरबाज पटेल यांनी नसरिन पटेल ही आजारी पडत असल्याने कोणत्या तरी मंत्रिकाच्या सांगण्यानुसार अंधश्रद्धेचे अघोरी प्रकारे कृत्य केले. दरम्यान खड्डा खोदून गंभीर, अघोरी प्रकार घडण्याची शक्यता होती. मात्र काही जणांच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस पाटील बाळू स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.
संपादन - गणेश पिटेकर