coronavirus - गरजू कुटुंबाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

हाताला काम नसल्याने दोन चिमुकल्यांसह हे पती-पत्नी लोणार (जि. बुलडाणा) येथे पायी निघण्याच्या तयारीत होते.  सामाजिक कार्यकर्त्यांना या कुटुंबाची अवस्था लक्षात येताच त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्यासह राहण्याचीही व्यवस्था करीत आधार दिला. 

आष्टी (जि. बीड) - पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करायला आलेल्या कुटुंबापुढे लॉकडाऊनमुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हाताला काम नसल्याने दोन चिमुकल्यांसह हे पती-पत्नी लोणार (जि. बुलडाणा) येथे पायी निघण्याच्या तयारीत होते. मात्र, आष्टीतील सामाजिक कार्यकर्त्यांना या कुटुंबाची अवस्था लक्षात येताच त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्यासह राहण्याचीही व्यवस्था करीत आधार दिला. 

लोणार येथील असलेले देवराज शिवाजी पवार व पत्नी गीता देवराज पवार हे पती-पत्नी विविध ठिकाणी रोजंदारी करून उपजीविका भागवतात. त्यांना सहा वर्षांची मुलगी संजीवनी व एक वर्षांची किरण अशा दोन मुली आहेत. सध्या काम नसल्याने या कुटुंबाची अक्षरशः उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे लोणारला पायी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन्ही चिमुकल्यांसह हे कुटुंब रस्त्याने जाताना तुषार काळे व भाऊसाहेब पठाडे यांना दिसले. त्यांनी चौकशी केली असता, त्यांनी परिस्थिती सांगितली. काळे व पठाडे यांनी कासारी-मुर्शदपूरचे सरपंच संतोष चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्ता रोहित दुशी यांचा मोबाईल क्रमांक दिला.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

सरपंच चव्हाण यांच्या सहकार्याने रोहित व त्यांचे सहकारी लॉकडाऊनपासून आष्टी-मुर्शदपूर भागातील गरजूंना दररोज घरपोच शिवभोजन देत आहेत. फोनवर संपर्क होताच काही क्षणात हजर होऊन रोहितने या कुटुंबाला जेवण पोहच केले. त्यानंतर समजले, की ही महिला दोन महिन्यांची गर्भवती असून तिला खाल्लेलं अन्न पचन होत नाही. मग त्या कुटुंबाला घेऊन सर्वजण सरकारी रुग्णालयात गेले. दवाखान्यात आवश्यक औषधी माजी सैनिक अंकुश खोटे यांनी आणून दिली. या कुटुंबाला निवाराही नव्हता. पोलिस अधिकारी अरुण कांबळे व तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबाची आष्टीतील एका मूकबधिर आश्रमशाळेत व्यवस्था करण्यात आली. या कुटुंबाच्या दोनवेळच्या जेवणाची जबाबदारी रोहित दुशी यांनी घेतली. 

हेही बघा - Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

...अन् तहसीलदार आल्या धावून 
आश्रमशाळेत प्रशासनाने इतर शहरांतून आलेल्या कुटुंबांना विलगीकरण म्हणून ठेवलेले आहे. रुग्णालयापासून शाळेचे अंतर दोन किलोमीटर असल्याने या कुटुंबाला रुग्णवाहिकेतून घेऊन जावे, अशी विनंती रुग्णालय प्रशासनाला कार्यकर्त्यांनी केली; पण त्यांनी नकार दिला. त्यावर संदीप परदेशी या युवकाने स्वतःच्या दुचाकीवर या कुटुंबाला एक-एक करून शाळेत पोच केले. तेथे नियुक्त केलेले कर्मचारी गैरहजर होते आणि शाळेत पूर्वीच वास्तव्याला असलेली मंडळी कोरोनाच्या भीतीने त्यांना आत घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे या कुटुंबाला गेटवर बसून राहावे लागले. तोपर्यंत तलाठी शिंदे शाळेत आले. त्यांचेही लोकांनी ऐकले नाही. मग तहसीलदार थेऊरकर यांनी येऊन लोकांची समजूत काढली व या कुटुंबाला एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली. 

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच  

चिमुकली म्हणाली, काका भूक लागली आहे... 
तुषार काळे व भाऊसाहेब पठाडे यांनी सुरवातीला या कुटुंबाची चौकशी केली असता त्यांनी याचक वृत्ती दाखविली नाही; परंतु चर्चा करीत असताना चिमुकल्या संजीवनीने ‘काका, खूप भूक लागली आहे,’ असे म्हणताच त्यांना या कुटुंबाची अवस्था लक्षात आली. या कुटुंबाला आधार देण्यासाठी मग सर्वजण पुढे आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support provided by social workers to needy families