सुरेंद्र सुर्वे यांनी दिला सॅम बहाद्दूर यांच्या आठवणींना उजाळा 

आदित्य वाघमारे
गुरुवार, 27 जून 2019

सुरेंद्र सुर्वे यांनी दिला सॅम बहाद्दूर यांच्या आठवणींना उजाळा

औरंगाबाद - ‘आता युद्धाची घटिका समीप आहे. मी तुम्हाला पाकिस्तानात शिरण्याचा आदेश देताच जगातील आपण आरंभलेला संग्राम थांबवण्यासाठी महाशक्ती पुढे येतील. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यापूर्वी आपण सगळेच अफगाणिस्तान सीमेवर भेटू,’ या शब्दांत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (ऊर्फ सॅम बहाद्दूर) यांनी वर्ष १९७१ च्या युद्धापूर्वीच आपले मनसुबे स्पष्ट केले होते. सीमेवर कर्तव्य निभावणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधताच अंगात शंभर हत्तींचे बळ भरले, अशा आठवणींना कॅप्टन (नि.) सुरेंद्र सुर्वे यांनी माणेकशॉ यांच्या स्मृतिदिनाच्या (२७ जून) पूर्वसंध्येला उजाळा दिला. 

तो दिवस होता २५-२६ नोंव्हेंबर १९७१ चा. भारत-पाक सीमेवर युद्धाला आरंभ होणार होता. सीमेवर उभ्या लष्कराशी संवाद साधत निघालेले फिल्ड मार्शल लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ हे सात इन्फन्ट्री डिव्हिजनच्या ३०० अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी पाच मिनिटांसाठी आले. त्या तीनशे अधिकाऱ्यांपैकी कॅप्टन सुर्वे एक होते. सीमेपासून १२ ते १५ किलोमीटर आत खेम करण सेक्‍टरमध्ये गव्हाच्या शेतात जमलेल्या या अधिकाऱ्यांच्या शेजारीच रोटर सुरूच असलेल्या हेलिकॉप्टरमधून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ उतरले. छोट्याशा पोडियमलगत उभे राहत त्यांनी आपल्या करड्या नजरेने सर्वांकडे नजर टाकत आपला संदेश आरंभला, ‘‘लवकरच मी तुम्हाला पाकिस्तानात घुसण्याचा आदेश देणार आहे. हे होताच जगातील महाशक्ती आपण आरंभलेला संग्राम थांबवतील. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यापूर्वी आपण अफगाणिस्तान सीमेवर भेटू...’’ असा स्पष्ट संदेश सॅम बहाद्दूर यांनी दिला. त्यांच्या या प्रोत्साहनाने अंगात शंभर हत्तींचे बळ संचारले. त्यांचे आदेश येताच पाकिस्तानकडे झेपावणारा पहिला तोफगोळा याच युनिटने रात्री साडेअकराच्या सुमारास उडवल्याची आठवण कॅप्टन (नि.) सुर्वे अभिमानाने सांगतात. 

महिलेला नजरेनेही खुणावले तर... 
आपण आपल्या आई, मुलगी आणि बहिणीच्या अब्रूवर कधीच हात टाकत नाहीत. हे तत्त्व सीमा ओलांडतानाही आपले लष्कर ध्यानी ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. हात लावणे सोडाच, एखाद्याने महिलेकडे पाहून नजरेने खुणावले जरी, तर त्याला ‘जागेवर ठार करा’ असे आदेश त्यांनी या अधिकाऱ्यांशी बोलताना दिल्याचे सुर्वे म्हणाले. पाकिस्तानात भारतीय लष्कर शिरल्यावर तेथील सैनिकांपेक्षा भारतीय सैन्याच्या उपस्थितीत तेथील महिलांना अधिक सुरक्षित वाटल्याचे श्री. सुर्वे म्हणाले. हा पाच मिनिटांमध्ये झालेला संवाद आटोपून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ माघारी गेले; पण त्यांचे शब्द आयुष्याच्या शेवटपर्यंत कानात घुमतील, असेही ते पुढे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surendra Surve told Sam Bahadur memories