महाविकास आघाडी सरकार अपयशी, मंत्री फेसबुकद्वारे संवाद साधण्यात मग्न - सुरेश धस 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून, फेसबुकच्याच माध्यमातून संवाद साधण्यात मंत्री मग्न आहेत. यामुळे शासनाला वास्तव परिस्थितीचे भान राहिले नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. 

आष्टी (जि. बीड) - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून, विरोधकांचे बोलणे अथवा सूचनांना ट्रोल करून केवळ फेसबुकच्या माध्यमातून परिस्थिती कशी नियंत्रणात आहे, हे दाखवून फेसबुकच्याच माध्यमातून संवाद साधण्यात मंत्री मग्न आहेत. यामुळे शासनाला वास्तव परिस्थितीचे भान राहिले नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. 

धस म्हणाले, की कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियोजनात व समन्वयाचा पूर्णपणे अभाव निर्माण झाला आहे. शासनाच्या या अपयशामुळे रोगाचा प्रादुर्भाव वरचेवर वाढत असून, महाविकास आघाडी सरकारला नैसर्गिक आपत्तीमध्ये अपयशी ठरल्यावरून धारेवर धरण्यासाठी राज्यात भाजपच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) राज्यभरात 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येत आहे. 

हेही वाचा - गेवराईच्या रेशन घोटाळ्यात फिर्यादी तहसीलदारालाच अटक

भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस व आष्टी येथील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या घरासमोरील अंगणात सोशल डिस्टसिंगचे पालन करून शुक्रवारी आंदोलन केले. धस यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनात त्यांचे कुटुंबीयही डोक्याला काळ्या पट्ट्या बांधत सहभागी झाले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. आमदार भीमराव धोंडे यांनीही त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Dhas accuses the state government