आश्चर्यच, जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेले मंडळ पंचनाम्यात नाहीच  

bail gadi
bail gadi

परभणी ः पालम तालुका पंचनाम्यापासून वंचित असून त्याचे ताजे उदाहरण पहावयास मिळाले. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी पावसानंतर पहिल्यांदा रावराजुर मंडळात भेट दिली होती. बैलगाडीतून प्रवास करून ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. ते गाव देखील पंचनाम्यामध्ये घेण्यात आलेले नाही. चाटोरी महसूल मंडळाची तीच गत असून बनवस व पेठशिवणी मंडळाचे नाव चर्चेत देखील नाही. त्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.  

हातातोंडाशी आलेला खरीप हंगामाचा घास हिरावला असतानाच जिल्हाधिकारी व आमदारांच्या प्रत्यक्ष पाहणीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले गेले. कारण दोघांनीही प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतरही पालम तालुका सरसकट पंचनाम्यापासून वंचित राहिला. केवळ पालम महसूल मंडळातील गावे पंचनाम्यात घेतल्याने तालुक्यातील शेतकरी पुरता नागवला असून त्यांच्यावर अस्मानीसह सुलतानी संकट ओढवले आहे. 

वरुणराजाची पिकांवर वक्रदृष्टी 
यंदा सुरुवातीपासून पिकांना लागतो, तेवढाच पाऊस झाला. परिणामी खरीप हंगामाची सर्वच पिके बहरली होती. ती काढणीला आली असतानाच गत पंधरवाड्यात वरुणराजाची वक्रदृष्टी त्यावर पडली. मूग, उडीदाला तर जागेवरच कोंब फुटले, ते तोडण्याची गरज देखील भासली नाही. सोयाबीन आणि कापसाची अवस्था त्यापेक्षा निराळी नव्हती. 

नुकसान भरपाई मिळेल, अशी दिली होती ग्वाही 
एवढे नुकसान झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालम तालुक्यात धाव घेऊन प्रत्यक्ष बांधावर गेले. त्यांनी रावराजुर, पालम, चाटोरी मंडळात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाही देखील दिली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येतील आणि ते सुरू आहेत, असे देखील वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यांच्यासोबत आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे उपस्थित होते. तदनंतर गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुन्हा पालम तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे आश्वासनाचा पाढा वाचला. त्यांनी पाठ फिरवली असताना पालम तालुक्यात पंचनाम्याचे आदेश आले. त्यात तालुक्यातील ८२ गावांपैकी एकट्या पालम महसूल मंडळातील गावाचे पंचनामे करण्याचे आदेश काढण्यात आले. त्याने तालुक्‍यातील उर्वरित शेतकरी चकित झाले. प्रारंभी त्यांना वाटले की, उर्वरित मंडळातील गावांचे आदेश नंतर काढण्यात येतील. शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक व पालम तहसीलला जाऊन चौकशी देखील केली. परंतू, काहीही उपयोग झाला नाही. त्याला आज पंधरवाडा लोटला. आज ना उद्या, सरसकट पंचनाम्याचे आदेश निघतील, या भाबड्या आशेवर शेतकरी विश्वास ठेवीत आहे. 


आंदोलनानंतरही आदेश नाहीत 
तालुक्यात सरसकट पंचनामे करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने पालम तहसीलसमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही उपयोग झाला नाही. आंदोलनात शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाऊ असे वक्तव्य देखील डॉक्टर गुट्टे यांनी केले. तरीही प्रशासन नमले नाही, हे विशेष. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com