पाणी ओसरताच ९५ जणांना सुखरुप काढले बाहेर; ग्रामस्थ, प्रशासनाने सोडला सुटकेचा निःश्‍वास

प्रकाश काशीद
Thursday, 15 October 2020

मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे उल्फा नदी व ओढ्या, फुटलेल्या पाझर तलावाच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या परंडा तालुक्यातील वडणेर शिवारातील नरसाळे वस्तीवरील एकूण 95 जणांना नदीचे पाणी ओसरताच सुखरुप बाहेर काढल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

परंडा (जि.उस्मानाबाद) : मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे उल्फा नदी व ओढ्या, फुटलेल्या पाझर तलावाच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या परंडा तालुक्यातील वडणेर शिवारातील नरसाळे वस्तीवरील एकूण 95 जणांना नदीचे पाणी ओसरताच सुखरुप बाहेर काढल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु होता. बुधवारी (ता. १४) पडलेल्या विक्रमी मुसळधार पावसाने सर्वत्र मोठा हाहाकार उडाला आहे.

तालुक्यातील वडणेर-देवगाव येथील उल्फा नदीला पूर आल्याने व वडणेर परिसरातील पाझर तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या परिसरातील नरसाळे व सलगरवस्तीवरील एकुण ९५ लोक पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडलेले होते. माहिती मिळताच रात्रीच उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नायब तहसिलदार गणेश सुपे, अजित वाबळे, मिलिंद गायकवाड, तलाठी ननवरे यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन अडकलेल्या ग्रामस्थांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी वरिष्ठस्तरावरुन उपाययोजना सुरु केली होती.

कहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात !  

गुरुवारी (ता.१५) सकाळपासून तहसीलदार हेळकर अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेसह तळ ठोकुन होते. दुपारी १२ च्या सुमारास दुधडी भरुन वाहणाऱ्या उल्फा नदीचा पाण्याचा विसर्ग कमी होऊन पूरजन्य परिस्थिती कमी झाली. पाणी कमी होताच नरसाळे वस्तीहुन आवारपिंपरी ते वडणेर रस्त्यावरुन अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढले. यामध्ये लहान मुले, एक महिन्याची बाळंतीण महिला, वयोवृद्धांचाही समावेश होता.

वस्तीवरील जनावरेही सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनास यश मिळाले. जर अचानक आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अडकलेल्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पुरातुन अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढल्याने प्रशासनासह नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. उल्फा व चांदनी या नद्यांचा देवगाव व वडणेर येथील पुलाजवळ संगम होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

उमरगा, लोहारा तालुक्यातील ४२ तलाव 'ओव्हरफ्लो'

नरसाळे वस्तीवरील पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या लहान मुलासह सर्वांना सुखरुप बाहेर काढले आहे. कोणतीही हानी झाली नाही. संबधित गावचे तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 20 आॕक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहे.
- अनिलकुमार हेळकर, तहसीलदार, परंडा

आम्ही सर्वजण पाण्याच्या वेढ्यातून सुखरुप बाहेर पडलो आहोत. तहसीलदार व प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले होते. मागील चार दिवसांपासुन शेतवस्तीवरील वीज गायब आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.
- शहाजी नरसाळे, पूरग्रस्त शेतकरी, नरसाळे वस्ती
 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stranded 95 Villagers Rescued In Paranda Taluka Osmanabad News