'स्वाराती'च्या वाढीव पन्नास जागा धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

महिनाभरात त्रुटींची पूर्तता करावी, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे पत्र
अंबाजोगाई - वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्‍त जागा व इतर त्रुटींमुळे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव पन्नास जागांची मान्यता रद्द होण्याची शक्‍यता आहे. महिनाभरात या त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) महाविद्यालयाला दिले आहेत.

महिनाभरात त्रुटींची पूर्तता करावी, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे पत्र
अंबाजोगाई - वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्‍त जागा व इतर त्रुटींमुळे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव पन्नास जागांची मान्यता रद्द होण्याची शक्‍यता आहे. महिनाभरात या त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) महाविद्यालयाला दिले आहेत.

येथील वैद्यकीय महाविद्यालयास तीन वर्षांपूर्वी वाढीव पन्नास जागांची मान्यता मिळाल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शंभर जागांचे प्रवेश होत होते; परंतु मागील ऑक्‍टोबर 2016 मध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या तीनसदस्यीय पथकाने महाविद्यालयाची तपासणी केली. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात जागांच्या मान्यतेनुसार 17 टक्‍के वैद्यकीय शिक्षकांच्या जागा रिक्‍त असणे, शोधनिबंध नियमानुसार (रिसर्च पेपर) नसणे व इतर काही त्रुटी आहेत. या त्रुटी महिनाभरात पूर्ण कराव्यात अन्यथा वाढीव पन्नास जागा रद्द करण्याचे पत्र या परिषदेने 16 जानेवारीला पाठविले आहे.

त्रुटींची पूर्तता करण्याची तयारी - अधिष्ठाता भास्कर खैरे
परिषदेच्या पत्रानुसार त्रुटी पूर्ण करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून त्यासाठी महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुखांच्या दोन बैठका झाल्या. महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागातील (रेडिओलॉजी) सर्वच जागा रिक्‍त आहेत. त्यासह इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

यंत्रसामग्रीच्या कमतरतेसह या आहेत त्रुटी
आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख आहे. महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दैनंदिन दीड ते दोन हजार रुग्णांची तपासणी होते. त्यातील तीस ते चाळीस टक्‍के रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थी व रुग्णांच्या सोयीसाठी हे महाविद्यालय सुसज्ज असणे आवश्‍यक आहे. या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांना पदोन्नतीवर प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकपदी नियुक्‍ती मिळाली होती; परंतु महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता या सर्वच जागा अद्यापही रिक्‍त आहेत. महाविद्यालयातील सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्रीचीही कमतरता आहे. अशा काही त्रुटी परिषदेच्या पथकाच्या निदर्शनास आल्या आहेत. या सर्व त्रुटी पूर्ण केल्यानंतरच पुढील वर्षी वैद्यकीयच्या वाढीव पन्नास जागांचे प्रवेश करता येणार आहेत.

Web Title: swarati medical college seats danger

टॅग्स