बेमोसमी स्वाइन फ्‍लूचा धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

हिवाळा-पावसाळ्यात आढळणारे स्वाइन फ्लूचे रुग्ण यावर्षी भरउन्हाळ्यात आढळू लागल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे; मात्र बेमोसमी आलेल्या स्वाइन फ्लूमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात शहरातील तिघांचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला.

औरंगाबाद - हिवाळा-पावसाळ्यात आढळणारे स्वाइन फ्लूचे रुग्ण यावर्षी भरउन्हाळ्यात आढळू लागल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे; मात्र बेमोसमी आलेल्या स्वाइन फ्लूमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात शहरातील तिघांचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला. 

राज्यातील इतर आरोग्य परिमंडळात स्वाइन फ्लूची लागण होण्याचे प्रमाण गेल्यावर्षी कमी होते; मात्र यावर्षी पहिल्या तिमाहीतच ३७ रुग्ण जिल्ह्यातील; तर १७ इतर जिल्ह्यांतील रुग्ण आढळले. यात जालना ३, परभणी ३, धुळे, नाशिक, बीड येथील प्रत्येकी एक, वाशीम २, तर बुलडाण्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

स्वाइन फ्लूमध्ये सर्दी, ताप; तसेच छातीत दुखण्याबरोबरच आता अतिसाराचे नवीन लक्षण उद्भवू लागले आहे. आरोग्य विभागातर्फे सर्दी व तापाबरोबरच अतिसाराचा त्रास होणाऱ्या रुग्णांनाही स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात येत आहे; तसेच परिमंडळातील सर्वच रुग्णालयांत औषधींची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रासह रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी टॅमी फ्लूच्या गोळ्या, औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शक्‍यतो रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळले पाहिजे; तसेच संशयित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. 
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक, औरंगाबाद

Web Title: Swine Flu Health Care Sickness Danger