तलवारी बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

वाळूज - जोगेश्वरी येथे राहत्या घरी धारदार तलवारी व शस्त्रे तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. दहा) या कारखान्यावर छापा टाकून एका २८ वर्षीय तरुणास जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चार धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

जोगेश्वरी झोपडपट्टीत एक व्यक्ती विनापरवाना व बेकायदेशीरपणे राहत्या घरी तलवारी व धारदार शस्त्रे तयार करीत असल्याची माहिती एका गुप्त बातमीदाराकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांना रविवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोगेश्वरी झोपडपट्टीत छापा टाकला असता शेख इरफान शेख युसूफ (२८) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे चार धारदार तलवारी, ग्राइंडर मशीन, एक ढाल व तलवार बनवण्याचे साहित्य असा मुद्देमाल आढळून आला.

याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब आंधळे, विजय होनवडजकर, पोलिस नाईक शैलेंद्र अडियाल, पोलिस शिपाई देविदास इंदोरे, बाबासाहेब काकडे, विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांच्या पथकाने केली.

वाळूज परिसर बनला गुन्हेगारांचे माहेरघर
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये हाणामाऱ्यांसह चोऱ्याचपाट्या, खून, दरोडे अशा घटनांमध्ये वाढ झाली असून वाळूज परिसर गुन्हेगारांचे माहेरघर बनले आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे या परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत वाळूज एमआयडीसी पोलिसांची संख्या अपुरी आहे. परिसरात गुन्हेगारांची दहशत निर्माण झाली असून येथील कामगार व नागरिक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Sword-making factory in valuj