esakal | आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा, यंदा उत्पादन वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Chinch

यंदा परतीच्या जोरदार पावसामुळे चिंचेच्या झाडांना मोठ्या प्रमाणात चिंचा लागल्या. त्यातून मोठे उत्पन्न निघणार असून, आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा येणार आहे.

आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा, यंदा उत्पादन वाढणार

sakal_logo
By
विलास कांबळे

हेर (जि.लातूर)  : यंदा परतीच्या जोरदार पावसामुळे चिंचेच्या झाडांना मोठ्या प्रमाणात चिंचा लागल्या. त्यातून मोठे उत्पन्न निघणार असून, आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा येणार आहे. या भागातील चिंचेला लातूर, उदगीर, हैदराबादसह इतर ठिकाणी मोठी मागणी असते. गतवर्षी परतीचा जोरदार पाऊस झाला. यंदाही तिच परिस्थिती होती. त्यामुळे चिंचेची झाडे बहरली असून, मोठ्या प्रमाणात चिंचेच्या झाडांना फळधारणा झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात चिंचेतून उत्पन्न मिळणार आहे.

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

एवढेच नाही तर चिंचेची काढणी, झोडपणी आणि फोडण्याच्या माध्यमातून महिला-पुरुषांना रोजगारही मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. हेरसह करडखेल, वायगाव, सताळा, कुमठा खुर्द, लोहारा नरसिंग वाडी बामाजीचीवाडी, जंगमवाडी, जयाबायचीवाडी, शंभुउमरगा, महादेववाडी या गावात चिंचेची मोठ-मोठी झाडे आहेत. यंदा परिसरात जून ते ऑगस्ट या महिन्यात चिंचेच्या ४ चार हजार रोपांची लागवड झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी त्यांची पाहणी केली.

बहुपयोगी झाड
चिंचेचे झाड हे बहुउपयोगी आहे. चिंचेच्या चिंचोके, टरफलसुद्धा उपयोगी आहेत. टरफलाचा वीटभट्टीसाठी वापर केला जातो. चिंचोक्यांपासून अनेक पदार्थ बनत असल्याने त्यालाही मोठी मागणी आहे. या झाडाचा पानांनाही आयुर्वेदात महत्त्व आहे.

या परिसरात दरवर्षी चिंच काढणी हंगामात ३५ ते ४० हजार क्विंटलच्या जवळ पास उत्पादन होते. यंदा या वाढ होणार आहे. त्यामुळे रोजगारातही वाढ होणार आहे.
- फतरू अब्दूल शेख, व्यापारी.

उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांना सोयी-सुविधांसह, मार्केटिंग तंत्रज्ञान, निर्यात तंत्रज्ञान शासकीय स्तरावरून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेबरोबर परदेशातील दुबई, थायलंड, सिंगापूर, इजिप्त, ऑस्ट्रेलिया या बाजारपेठेत चिंच विक्री केल्यास आर्थिक फायदा जास्त होईल.
- विश्वनाथ एकलिंगे, चिंच उत्पादक, जंगमवाडी

Edited - Ganesh Pitekar