वसतिगृहातील मुलींशी तनिष्कांनी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

बीड - केवळ प्रतिमेला हार आणि फुले घालून घोषणा न देता बीडमधील तनिष्का सदस्यांनी वसतिगृहात जाऊन तेथील मुलींशी आरोग्यविषयक संवाद साधत त्यांची आरोग्य तपासणी केली. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.

बीड - केवळ प्रतिमेला हार आणि फुले घालून घोषणा न देता बीडमधील तनिष्का सदस्यांनी वसतिगृहात जाऊन तेथील मुलींशी आरोग्यविषयक संवाद साधत त्यांची आरोग्य तपासणी केली. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तनिष्का सदस्यांनी गेली तीन वर्षे वेगवेगळे उपक्रम राबविले. दोन वर्षांपूर्वी शहरातील कचरा वेचणाऱ्या आणि घंटागाडी चालविणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना वर्षभर मोफत औषधोपचार करण्यात आला होता. गेल्या वर्षी शहरातील तेलगाव नाक्‍यावरील भटक्‍या मुक्तांच्या पालावर जाऊन तनिष्कांनी तेथील महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार केले होते. यावर्षी शहरातील बार्शी रोडवरील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मंगळवारी (ता. तीन) दुपारी तीन वाजता तनिष्का गटप्रमुख डॉ. सत्यभामा चोले, तनिष्का सदस्या व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तांबडे, डॉ. डिम्पल ओस्तवाल यांनी जाऊन तेथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वयात शरीरात होणारे नैसर्गिक बदल आणि त्यातून उद्‌भवणारे आजार याविषयी चर्चा केली. त्यानंतर या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी केली. अनेक मुलींच्या अंगात हिमोग्लोबीनची कमतरता दिसून आली.

डॉ. तांबडे म्हणाल्या, की शालेय वयात शरीराची योग्य काळजी घेतली तर पुढची पिढी व्यवस्थित घडेल. नियमित व्यायम आहारात जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. चांगले शिक्षण घेतले तरच समाजात आपल्याबद्दलचा आदर वाढतो. 

डॉ.चोले म्हणाल्या, की सकस आहार, हंगामी फळे खाण्यास ठेवावीत. निसर्गाने शरीरात जे बदल घडतात त्यातून मानसिक बदल घडत असतात. त्याला सामोरे जाताना आपल्याकडून चुकीचे वर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी. डॉ. ओस्तवाल म्हणाल्या, की आपण शरीराची जेवढी स्वच्छता ठेवू तेवढे आपले आरोग्य चांगले राहिल. नियमित तपासण्या करून घेण्याची गरज आहे. वसतिगृहाच्या अधीक्षक रंजना दराडे यांनी सर्वांचे स्वागत केले. 

Web Title: Tanishka women interacted with girls hostel