टॅंकरची ई-निविदा प्रक्रिया अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

बीड - २०१७ या वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-निविदा मागविल्या होत्या; मात्र दोनदा मुदतवाढ देऊनही टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

दरवेळी केवळ एकाच एजन्सीच्या निविदा आल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने ही ई-निविदा प्रक्रिया शुक्रवारी (ता. १३) रद्द केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

२०१७ या वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत पाणीटंचाई उद्‌भवल्यास पाणीटंचाई निवारणार्थ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने ई-निविदा मागविल्या होत्या. यासाठी २८ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ई-निविदा भरण्याची मुदत देण्यात आली होती. २६ डिसेंबरला ही निविदा उघडण्यात येणार होती; मात्र विहित मुदतीमध्ये टॅंकरसाठी केवळ एकाच एजन्सीची निविदा आली होती. निविदा प्रक्रियेमध्ये किमान तीन एजन्सीच्या निविदा आल्यास पुढील प्रक्रिया करण्यात येते; मात्र असे होऊ शकले नाही. त्यामुळे या निविदेबाबत शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून निविदा प्रक्रियेला दोन जानेवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली; मात्र दोन जानेवारीलादेखील संकेतस्थळावर केवळ एकच एजन्सीची निविदा उपलब्ध झाल्याने निविदा प्रक्रियेला तीन जानेवारीला दुसरी मुदतवाढ देण्यात आली. यावेळी ११ जानेवारीपर्यंत या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली; परंतु यानंतरही ऑनलाइन प्रक्रियेत केवळ एकाच एजन्सीची निविदा आल्याने व या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. १३) टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ही ई-निविदा प्रक्रियाच रद्द केली. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तसे आदेश काढले आहेत. 

न्यायालयात घेणार धाव
जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये आपल्या एजन्सीने सहभाग घेतला होता, असे कंत्राटदार सुभाष पाटील यांनी सांगितले; मात्र दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही अन्य कोणत्याच एजन्सीने ई-निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी एजन्सीने प्रतिसाद न दिल्यामुळे सदर निविदा आपल्या एजन्सीला द्यावयास हवी होती; मात्र जिल्हा प्रशासनाने पूर्वीच्याच कंत्राटदारासाठी ही ई-निविदा प्रक्रियाच रद्द करण्याचा घाट घातल्याचा आरोप करीत याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया कंत्राटदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: tanker e-tender process cancel