टॅंकरचा पाणीपुरवठा पुन्हा पाडला बंद

Water-Tanker
Water-Tanker

औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. टॅंकरने पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टाक्यांवरून टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडण्याचे सत्र सुरूच आहे.

शहराचा पाणीप्रश्‍न महिनाभरापासून गंभीर बनला आहे. सिडको-हडको भागात नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ज्या नागरिकांनी टॅंकरसाठी पैसे भरले आहेत, त्यांनाही पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरिक पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन आंदोलने करीत आहेत. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी पाणी प्रश्‍नात लक्ष घातल्यानंतर एमआयडीसीने सिडको एन- एक येथे महापालिकेला टॅंकर भरण्यासाठी सोय करून दिली. त्यामुळे एन- पाच व एन- सात येथील टॅंकरचा भार कमी होईल, असे सांगण्यात आले. 

मात्र, या दोन्ही ठिकाणीच अद्याप मोठ्या प्रमाणात टॅंकर भरले जात आहेत. त्यामुळे नळाचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. सोमवारी (ता.२९) आनंदनगर, जयभवानीनगर, भारतनगर येथील चाळीस ते पन्नास महिला-नागरिकांनी पाण्यासाठी एन-पाच येथील टाकीवर धाव घेतली. 

आठ दिवसांपासून नळांना पाणी आले नाही. त्यात टॅंकरही बंद आहेत, असे सांगत जोपर्यंत टॅंकर मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. उन्हाचा पारा ४२ अंशांवर गेलेला असताना नागरिकांनी तासभर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या काळात टॅंकरचा पुरवठा ठप्प झाला. माहिती मिळताच उपायुक्त रवींद्र निकम यांनी टाकीवर धाव घेत आंदोलकांना टॅंकरने पाणी देण्याचे आश्‍वासन दिले.

त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. या वेळी दत्ता गाडे, सविता झिने, बबिता साळवे यांच्यासह महिला-नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com