‘कोरोना’च्या लढाईत शिक्षकही उतरले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

गंगाखेड (जि.परभणी) येथील शिक्षक विनायक पवार करताहेत स्पीकरवर जनजागृती

परभणी : कोरोनाच्या लढाईत प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. परंतु, ही लढाई केवळ प्रशासनाचीच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचीदेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची जबबादारी ओळखून या लढ्यात घरी राहून आपले योगदान दिले पाहिजे. गंगाखेडमधील (जि.परभणी)  एका शिक्षकाने तर रस्त्यावर उतरून लोकांसाठी जनजागृती सुरू करून कोरोनाच्या लढाईत आपलेही योगदान दिले आहे.

गंगाखेड (जि.परभणी) येथील व्यंकटेश विद्यालयातील शिक्षक विनायक पवार हे सध्या शहरात स्वंयत्स्फूर्तीने जनजागृती करीत आहेत. ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, आरोग्य, बालविवाह, हुंडाबंदी आदी विषयांवर ते वेगवेगळ्या माध्यमातून १५-२० वर्षांपासून जनजागृती करतात. अगदी रेल्वेतही ते व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देतात. रेल्वेतील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे नांदेड विभागीय महाप्रबंधक यांनी त्यांचा विशेष गौरव यापूर्वी केला होता. तंटामुक्त अभियान, ग्राम स्वच्छता अभियानात अशा वेगळ्या कार्यात केवळ मार्गदर्शक नव्हे तर स्वतःच्या हाताने घाण साफ करण्याचे कामही ते करतात. रस्त्याने चालताना एखाद्या व्यक्तीच्या हातात तंबाखू अथवा गुटख्याची पुडी दिसली तर ती त्याच्या हातातून हिसकावून घेत त्याला गुटखाबंदीचे महत्त्व समजावून सांगतात. असा हा अवलिया कोरोना विरोधाच्या लढाईत मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. सकाळी- सकाळी बाहेर पडल्यानंतर शिक्षक आपल्या सोबत असलेल्या छोट्याशा स्पीकरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यासह गल्लीबोळांत फिरून कोरोना संदर्भातील जनजागृती करीत आहेत.

स्वयंप्रेरणेने स्वखर्चातून कार्य
रस्‍त्‍यावर बसू नये, पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र बसू नये, बिनाकामाचे घराबाहेर पडून नका, जमावाने एकत्र थांबू नका, मंदिर व प्रार्थना स्थळात आपण एकत्र जमून करू नका, हात धुवा, तोंडास मास्क, रुमाल बांधा, गर्दी करू नका अशा शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नका, अशा सूचना लोकांना देत आहेत. शासनाने पैसे मोजून जे काम करायला पाहिजे ते कार्य हे शिक्षक स्वयंप्रेरणेने स्वखर्चातून करीत आहेत.

हेही वाचा -   परभणीतील उद्योग अडकले ‘कंटेंटमेंट झोन’मध्ये !

हेही वाचा...
जिंतूरमध्ये प्रशासनाची शोध मोहिम

जिंतूर (जि.परभणी) :‘ लॉकडाउनमुळे जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातील रेड झोनमधून खुश्कीच्या मार्गाने येऊन शहर व परिसरात लपून बसलेल्या नागरिकांची पोलिस व नगर परिषद प्रशासनाने सोमवार (ता. २०) पासून शोध मोहीम सुरू केली. परंतु, अशा नागरिकांची माहिती देण्यास नातेवाईक, आजूबाजूचे लोक उदासीन दिसत असल्याने मोहिमेच्या कामात व्यत्यय येत आहे.

हेही वाचा - Video : आधी फवारणी, मगच मिळणार इंधन
जिंतूर तालुक्यातील तीस हजारांपेक्षा जास्त नागरिक नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच मजुरीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद, नागपूर ठिकाणी स्थलांतरीत झालेले आहेत. परंतु, भीतीपोटी पायपीट करत अथवा वाहनांमधून मध्यरात्री प्रवास करून जिल्हा सीमाबंदीच्या चेकपोस्ट वरील चौकशीपासून वाचण्यासाठी खुश्‍कीचा मार्ग अवलंबून जिंतुरात मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. अशांचा शोध घेण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. दरम्यान, परतलेल्यांची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक घोरबांड यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Awareness About Corona,parbhani news