शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

गजानन आवारे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सारवाडी (ता. पैठण) अंतर्गत येणाऱ्या रामेश्‍वरनगर येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्षापासून एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

जायकवाडी ( जि.औरंगाबाद ) : इसारवाडी (ता. पैठण) अंतर्गत येणाऱ्या रामेश्‍वरनगर येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्षापासून एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
रामेश्वरनगरच्या पालकांनी पैठणचे गटशिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. त्यात दहा ऑगस्टपर्यत शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना शाळेवर पाठवावे, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शनिवारी (ता. दहा) दिला होता. शाळेत शिक्षक हजर न झाल्याने संतप्त पालकांनी सकाळी शाळेला कुलूप ठोकले. रामेश्वरनगरच्या शाळेतील सहशिक्षिका प्रतिनियुक्तीवर आहेत.

या शाळेत पहिली ते चौथीपर्यत वर्ग आहेत. या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र, मागील एक वर्षापासून येथील एक सहशिक्षिका प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे मागील एक वर्षभरापासून एकच शिक्षकावर येथील शाळेचा भार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संतप्त पालकांनी वेळोवेळी पंचायत समितीकडे शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली. मात्र, शिक्षण विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज ग्रामस्थ, पालकांनी अखेर शाळेला कुलूप ठोकले. यावेळी प्रकाश चव्हाण, अजीम शेख, अमोल सोनवणे, रवी सोनवणे, राजू चव्हाण, कृष्णा पाटणकर यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For teacher demand villagers locked school