आरक्षणाच्या विवंचनेतून आत्महत्या केलेल्या पाटील यांचे पोस्टमार्टम रोखले; ठिय्या आंदोलन सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

ग्रामीण रूग्णालयात रमेश पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) आणल्यानंतर तो संतप्त ग्रामस्थ व युवकांनी रोखून धरला. (कै.) पाटील यांच्या कुटुंबांतील एकाला अगोदर सरकारी नोकरी द्यावी व त्यानंतरच पोस्टमार्टम करावे, अशी भूमिका सर्वांनी घेतली. त्यानंतर रूग्णालयासमोरील लातूर - बार्शी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  

मुरूड (जि. लातूर)  : मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून माटेफळ (ता. लातूर) येथील शिक्षक रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड होताच आरक्षणाच्या मागणीवर अगोदरच आंदोलनाच्या तयारीत असलेले ग्रामस्थ आणि युवक संतप्त झाले. येथील ग्रामीण रूग्णालयात रमेश पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) आणल्यानंतर तो संतप्त ग्रामस्थ व युवकांनी रोखून धरला. (कै.) पाटील यांच्या कुटुंबांतील एकाला अगोदर सरकारी नोकरी द्यावी व त्यानंतरच पोस्टमार्टम करावे, अशी भूमिका सर्वांनी घेतली. त्यानंतर रूग्णालयासमोरील लातूर - बार्शी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  

दुपारी साडेतीनपासून हे आंदोलन सुरू असून उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह प्रशासनाचे प्रतिनिधी येथे दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी येथे येऊन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही किंवा रमेश पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. माटेफळ येथील शिक्षक रमेश पाटील यांनी आरक्षण नसल्याने त्यांच्या दोन मुली व एका मुलाला नोकरीपासून वंचित रहावे लागत असल्याच्या नैराश्यातून बुधवारी (ता. 8) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी ही बाब आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून पुढे आणली.

मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना ही घटना घडल्याने मराठा समाजातील नागरिक व युवक संतप्त झाले. (कै.) पाटील यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर मागण्या मान्य केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. सुरवातीला नायब तहसीलदार शिवाजी पालेपाड व सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी भूमिका तीव्र केली. (कै.) पाटील यांच्या कुटुंबातील एका मुलीला सरकारी नोकरी द्यावी, त्यांच्या कुटुंबावरील कर्ज माफ करावे तसेच मराठा आरक्षण द्यावे, या मागण्या मान्य केल्यानंतरच शवविच्छेदन करून देण्याची तसेच मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी आंदोलनकर्त्यांनी दाखवली. त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थ व युवकांनी रूग्णालय तसेच बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे गावातून गेलेल्या लातूर - बार्शी रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली. येथे बुधवारचा आठवडी बाजार असल्याने या आंदोलनामुळे बाजारही थोडा विस्कळीत झाला. प्रशासनाचे प्रतिनिधी डॉ. काळे व श्री. वरकड यांनी मागण्यांबाबत राज्य सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जिल्हाधिकारी स्वतः येऊन लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा तसेच रमेश पाटील यांचे शवविच्छेदन करू न देण्याचा आंदोलनकर्त्या ग्रामस्थ व युवकांचा निर्धार रात्री उशिरापर्यंत कायम होता.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Teacher Ramesh Patils postmortem has been stopped