भटके विमुक्त कुटुंबियांच्या मदतीसाठी संघ सरसावला

शिवचरण वावळे
Wednesday, 1 April 2020

कोरोना विषाणुचा संसर्ग पसरू नये यासाठी केंद्राने संपूर्ण देशच लॉकडाऊन केला आहे. परिणामी, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची भूकबळी होत आहे. त्यासाठी रष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती निवारण समिती धावून आली आहे. शहराच्या विविध भागात समितीच्या वतीने किराणा मालाची किट दिली जात आहे.

 

नांदेड : कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात पसरला आहे. कोरोनामुळे जगभरातील रोज हजारो लोकांचा मृत्यु होत असल्याने सर्व देश हतबल आहेत. कोरोना आजाराने भारतात शिरकाव केल्याने देशात २२ मार्च २०२० पासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. अचानक ओढवलेल्या लॉकडाऊन संकटामुळे तळहातावरचे पोट असणाऱ्या हजारो कुटुंबियांची उपासमार सुरु झाली आहे. धर्माबाद तालुक्यात शेकडो भटके विमुक्त, नाथजोगी कुटुंब वास्तव्यास आहेत. मागील आठ दिवसापासून त्यांच्या जेवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या मदतीसाठी संघ धावून आला आहे. यामुळे काही दिवसाकरिता का होईना या समाजाची भुकबळीपासून सुटका झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हातावर पोट भरणारे, शिक्षणासाठी गाव सोडुन आलेले विद्यार्थी, भटके, पालावर राहणारे, पीडित-गरजू याशिवाय प्रवासात अडकून पडलेल्या असंख्य कुटुंबासमोर जेवणाचा पेच निर्माण झालेला आहे. नांदेड येथे रष्ट्रीय स्वयंसेवक  संघ आपत्ती निवारण समितीद्वारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मदत सुरु करण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यातील बाचेगाव येथील भटके विमुक्त - नाथजोगी समाजाचे शेकडो कुटुंबीय वास्तव्यास आहेत. 

हेही वाचा- दिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश

शेकडो कुटूंबियांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला
या गरजवंताना संघाच्या मदत केंद्रातून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. याशिवाय शहरातील पन्नास कुटुंबातील आडीचशे व्यक्तींना पाच दिवसापासून अन्नदान कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर येथे देखील शेकडो कुटूंबियांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबियांची माहिती मिळताच संघाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्या कुटूंबियांना अन्न - धान्य पुरवठा करण्यात आला. 

हेही वाचले पाहिजे- तिन्ही शासकीय रुग्णालयात दोनशे आयसोलेशन वार्ड

आठ दिवस पुरेल इतके धान्य पुरविण्यात येत आहे
नांदेड शहरातील शांतिनगर, विष्णूनगर भागात उतरप्रदेशातील काही कुटुंबिय वास्तव्यास आहेत.  शिवाय वासुदेव समाजाच्या परिवाराला देखील धान्य पुरविण्यात आले आहे. शहरातील बालगीर महाराज मठ परिसर, रेणुकामाता मंदिर परिसर, हबीब टॉकीज परिसर, गाडीपुरा, श्रद्धानगर, बालाजीनगर, महामाई माता मंदिर, भोई गल्ली, बौद्धवाडा, उदासी मठ, कलाल गल्ली, सिडको, छत्रपती चौक, जवाहरनगर या ठिकाणी अनेक परिवारांना पुढील आठ दिवस पुरेल इतके धान्य (किराणा मालाची कीट) पुरविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Team Rushed To Help The Families Of Wandering Free Families Nanded News