आम्हाला परीक्षेत यश मिळवणे झाले सुलभ ; असं कोण म्हटलं, ते वाचाच  

प्रमोद चौधरी
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

तीन ते बारा फेब्रुवारीपर्यंत झालेल्या दहा दिवसीय मिशन स्कॉलरशिप सराव शिबिराचा बुधवारी (ता.१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे समारोप झाला.

नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करता यावा, त्यांनाही शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत बरोबरीने सहभागी होता यावे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी ‘मिशन स्कॉलरशिप सराव शिबीर’ हा उपक्रम राबवला. 

शहरातील मुलांच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी त्यांना उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांमुळे मागे राहतात. त्यांना शहरातील मुलांप्रमाणे शिकवणी वर्ग, परीक्षांचा भरपूर सराव, आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण या गोष्टी अभावानेच मिळतात. काळानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही बदलणे आवश्‍यक आहे. नव्हे ती काळाची गरज आहे. परंतु, हा बदल घडविण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात काही मोजक्याच विद्यार्थ्यांना यश येते. असे होऊ नये, म्हणून वाजेगाव शैक्षणिक बिटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी ‘मिशन स्कॉलरशिप सराव शिबीर’ हा उपक्रम राबवला. 

Image may contain: 49 people, including Saiprasad Nanded, people smiling, outdoor
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांनी वाजेगाव शैक्षणिक बीटमधील मिशन शिष्यवृत्ती सराव शिबिराला भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तज्ज्ञ शिक्षकांची उत्तम साथ
‘मिशन स्कॉलरशीप सराव शिबिर’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास तर बळावलाच; पण एक वेगळी दीशाही मिळाली. या अभिनव उपक्रमाला बीटमधील तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तम साथ मिळाली. निश्‍चितच शिबिरात सहभागी विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरून गुणवत्ता यादीत झळकतील अशी अपेक्षा ग्रामस्थांसह शिक्षकांनी व्यक्त केली.  

तज्ज्ञ शिक्षकांचा केला गौरव
दरम्यान केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे यांनी या शिबिराला भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये ऊर्जा निर्माण केली. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक सारंग स्वामी, सायलू मंकोड, जगजित ठाकूर, रूपेश गाडेवाड, रामेश्वर आळंदे, श्रीराम मोगले, विजय गादेवार, अक्षय ढोके, पौर्णिमा अंकमवार, सूमैया खुटानबुजे, अश्विनी गोडीगवार, उषा एडके आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.  

Image may contain: 6 people, including Ramesh Raut and Hafiz Ghadiwala, people smiling, people sitting, people standing, tree, table and outdoor
मिशन शिष्यवृत्ती सराव शिबिरातील तज्ज्ञ शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करताना शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी.

यांचे मिळाले सहकार्य
शिबिरासाठी वाजेगाव बीटमधील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची दररोज सुरक्षित ने-आण केल्याबद्दल केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे, पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार, यशवंत सोनकांबळे, तुकाराम रेनकुंटवार, बेबिसरोजा परभत, हणमंत तिडके, शोभा तोटावाड, लक्ष्मी गायकवाड, वडगाव शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. ‘‘शिबिराचा आम्हाला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अतिशय फायदा झाला असून, आम्हाला परीक्षेत यश मिळवणे सुलभ झाले आहे’’, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

पालकांनी मुलांचा कल लक्षात घ्यावा


मंगाराणी आंबुलगेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा, नांदेड

मी देखील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. मला वकील, पोलिस, राजकारणी होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या आवडीनुसार, त्यांना ज्यात गती आहे, ज्याकडे मुलांचा कल अधिक आहे अशा क्षेत्रात त्यांना पाठवण्याकडे पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे.
- मंगाराणी अंबुलगेकर, अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड.

मुलांना शंभर टक्के प्रगत करण्याचा ध्यास

Image may contain: 1 person, eyeglasses
व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी

वाजेगाव शैक्षणिक बीटमधील शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या आहेत. वॉटर बेल, बालसभा, अक्षर रांगोळी यासारखेराज्यभर अनुकरण केलेले उपक्रम राबविले जातात. मुलांना शंभर टक्के प्रगत बनविणे हेच, आमचे ध्येय असून त्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत.
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We found the Exam test successful Nanded News