esakal | कारमधील दहा लाख रुपये पळवले, उदगीरात पोलिस अधीक्षक असताना घडली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

उदगीर शहरातील रजिस्ट्री कार्यालयासमोरील थांबलेल्या कारमधील दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी कारच्या काचा फोडून पळविल्याची घटना बुधवारी (ता.चार) भर दुपारी दीडच्या सुमारास घडली.

कारमधील दहा लाख रुपये पळवले, उदगीरात पोलिस अधीक्षक असताना घडली घटना

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरातील रजिस्ट्री कार्यालयासमोरील थांबलेल्या कारमधील दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी कारच्या काचा फोडून पळविल्याची घटना बुधवारी (ता.चार) भर दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी दिलीप नागप्‍पा मुढाळे (रा.सावळी, ता.कमालनगर, कर्नाटक) हे प्लॉटच्या खरेदी-विक्रीसाठी येथील रजिस्ट्री कार्यालयात गेले होते. त्यांची कार (केए २५ झेड ६६८६) रजिस्ट्री कार्यालयासमोर पार्क केली होती. कारमध्ये दहा लाख ५८ हजार रुपये रोख, पॅनकार्ड, आधारकार्ड साक्षांकित केलेले मुद्रांक ठेवून गाडी लॉक केली होती.

गप्पागोष्टी पडल्या महागात, पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी केले चार पोलिसांना निलंबित


चोरट्यांनी पाळत ठेवून दुपारी दीड ते दोनच्या सुमारास या कारच्या काचा फोडून आतील रोख रक्कम व कागदपत्रे घेऊन पसार झाले. गाडीच्या काचा फोडून आतील पैशे चोरण्यात आल्याचे फिर्यादी सायंकाळी चारच्या सुमारास गाडी जवळ गेल्यानंतर लक्षात आले. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून यात दोन अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. उदगीर शहर व परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने येथील प्लॉट व जमिनीच्या भरमसाठ किमती वाढल्या आहेत.

येथे दररोज कोट्यवधी रुपयाचे दस्तावेज नोंदणी होत असतात. येथील व्यवहार मोठे असल्याने चोरट्यांनी लक्ष ठेवून ही चोरी केली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे मोटरसायकल चोरी करून निघून जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून नेमके हे चोरटे कोण? याचा पोलिस शोध घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोनेसाखळी चोरी, घरफोड्या, दरोड्याच्या घटना कमी झाल्या असताना अचानकपणे बुधवारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे पुन्हा उदगीरकरांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीने रितसर फिर्याद दिली असून या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यां‍वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

चोरीच्या वेळी पोलीस अधीक्षक शहरात...
लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे बुधवारी उदगीर दौऱ्यावर असताना व त्यांची उपस्थिती शहरात असताना रजिस्ट्री कार्यालयासमोर एवढ्या मोठ्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे या चोरट्यांनी धिंडवडे काढत पोलीस अधीक्षकांना सलामीच दिली आहे.


संपादन - गणेश पिटेकर