सावधान, चोर तुमच्या दारात! लातूर जिल्ह्यात दहा महिन्यात ७० घरफोड्यात ८१ लाखांचा ऐवज चोरीला

हरी तुगावकर
Friday, 13 November 2020

लातूर जिल्ह्यात काही महिन्यांपासून घरफोड्या, बँकातून बाहेर आल्यानंतर बॅग लिफ्टिंग, दुकान फोडी असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत.

लातूर : जिल्ह्यात काही महिन्यांपासून घरफोड्या, बँकातून बाहेर आल्यानंतर बॅग लिफ्टिंग, दुकान फोडी असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. दहा महिन्यांत शहरात ७० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात चोरांनी ८१ लाखांचा ऐवज लंपास चोरून नेला आहे. त्यात आता दिवाळी सुरू झाली आहे. बाजारपेठेत लगबग सुरू आहे. अनेक जण बाहेरगावीही जात आहेत. या काळात घटना वाढण्याची शक्यता आहे. चोर आपल्या दारात आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच आता काळजी घेण्याची गरज आहे. पोलिसांनीदेखील गस्त वाढवण्याची गरज आहे.

यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने सोडले तर मार्चपासून कोरोनाचा लॉकडाउन सुरू झाला. ऑगस्टपर्यंत हा लॉकडाउन होता. या काळात काही चोरीच्या घटना घडल्या. यात जेलमधून अनेक चोर बाहेर आले होते. त्यात गेल्या काही महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. यात घरफोडी, दुकानफोडी अशा घटनात वाढ होत चालली आहे. दहा महिन्यांत घरफोडीच्या ७० घटना शहरात घडल्या आहेत. यात ८१ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.यावर्षीच्या दिवाळीला सुरवात झाली आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी चोरांचाही वावर आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी सतीश चव्हाणांना निवडून द्या

गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर महिलांचे दागिने चोरण्याचे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन बाहेर फिरताना महिलांनी काळजी घेण्याची गरज आहे.दिवाळीचा सण असल्याने बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. अशा ठिकाणीही चोर पाळत ठेवून आहेत. बँकेतून एखादा व्यक्ती मोठी रक्कम घेऊन आला तर त्याची बॅग पळवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या एक महिन्यात असे तीन प्रकार घडले असून, यात आठ दहा लाखांपर्यंतची रक्कमही चोरट्यांनी पळवली आहे. त्यामुळे बँकेतून रक्कम काढून घरी नेतानाही नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

वीस घरफोड्या उघडकीस
शहरात दहा महिन्यात ७० घरफोड्या घडल्या आहेत. यात पोलिसांनी वीस घरफोड्या उघडकीस आणून १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे; तसेच नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

Edited : Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Months 70 House Robbery Incidents Happened In Latur District